इलेक्ट्रिक कार चार्जिंगदरम्यान भीषण आग; सिलेंडर स्फोटांची मालिका, सात जणांचा मृत्यू

    18-Mar-2026
Total Views |
- डिजिटल लॉकमुळे सुटका अशक्य
Image Source:(Internet)

भोपाळ: मध्य प्रदेशातील इंदूर शहरात बुधवारी पहाटे एक हृदयद्रावक दुर्घटना घडली. इलेक्ट्रिक कार चार्जिंगदरम्यान झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. बंगाली स्क्वेअर परिसरातील बृजेश्वरी कॉलनीत पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुगालिया कुटुंबाच्या घराबाहेर इलेक्ट्रिक कार चार्जिंगसाठी लावण्यात आली होती. अचानक चार्जिंग पॉईंटवर शॉर्ट सर्किट होऊन कारला आग लागली आणि काही क्षणांतच ती आग घरापर्यंत पोहोचली. आग इतक्या वेगाने पसरली की घरातील लोकांना सावरायलाही वेळ मिळाला नाही.

घरात मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर्स आणि ज्वलनशील रसायनांचा साठा असल्यामुळे आगीने भीषण रूप धारण केले. आगीच्या विळख्यात सिलेंडर्स आल्याने एकामागून एक जोरदार स्फोट झाले आणि संपूर्ण परिसर हादरून गेला. स्फोटांची तीव्रता इतकी होती की घराचा काही भाग कोसळला, त्यामुळे आत अडकलेल्या लोकांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.

या घटनेत डिजिटल लॉकही अडथळा ठरले. घराला बसवलेल्या इलेक्ट्रॉनिक कुलूपांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यावर दरवाजे उघडले नाहीत. त्यामुळे घरात अडकलेल्या लोकांना वाचवणे अत्यंत कठीण झाले आणि बचाव पथकांना दरवाजे तोडून आत प्रवेश करावा लागला.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या वेळी घरात काही नातेवाईकही उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून दुर्घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.