नाशिक हादरले! ‘ज्योतिषाच्या’ नावाखाली अत्याचार; ५८ आक्षेपार्ह व्हिडिओंमुळे ब्लॅकमेलिंग रॅकेटचा संशय

    18-Mar-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नाशिक : शहरात एका धक्कादायक आणि संतापजनक प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे. स्वतःला ज्योतिष आणि कॉस्मोलॉजी तज्ज्ञ म्हणवणाऱ्या अशोक खरात याला एका ३५ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे. तपासादरम्यान त्याच्या कार्यालयातून तब्बल ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याने हनी-ट्रॅप आणि ब्लॅकमेलिंगच्या मोठ्या रॅकेटचा संशय व्यक्त केला जात आहे.

महिलेच्या तक्रारीनंतर प्रकरण उघड-
नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात पीडित महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला. महिलेच्या आरोपानुसार, भविष्य सांगण्याच्या नावाखाली आरोपीने तिचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला.

कार्यालयातून ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त-
तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीच्या कार्यालयावर छापा टाकून सीसीटीव्ही फुटेज आणि एक पेन ड्राइव्ह जप्त केली. या पेन ड्राइव्हमध्ये ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ आढळून आले असून, त्यात अनेक महिलांचे तसेच काही प्रभावशाली व्यक्तींशी संबंधित माहिती असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गुप्त कॅमेरे लावून जाळे उभारल्याचा संशय-
प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की आरोपीने आपल्या कार्यालयात गुप्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. महिलांना भविष्याची भीती दाखवून किंवा विविध प्रलोभन देऊन त्यांना जाळ्यात ओढले जात होते. त्यानंतर अत्याचार करून त्याचे चित्रीकरण केले जात असल्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. या व्हिडिओंच्या आधारे ब्लॅकमेलिंगचे जाळे उभे केले होते का, याचा तपास सुरू आहे.

क्राइम ब्रांचचा तपास वेगात-
या प्रकरणाचा तपास सध्या नाशिक क्राइम ब्रांचकडून केला जात असून, आणखी पीडित महिलांचा शोध घेतला जात आहे. तसेच या प्रकरणात इतर कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे. या घटनेमुळे काही प्रभावशाली व्यक्तींमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा आहे.