मृतांचा आकडा २५ वर
Image Source:(Internet)
नागपूर : राऊलगाव परिसरातील एसबीएल (SBL) कंपनीत झालेल्या भीषण स्फोटप्रकरणी न्यायालयाने कडक भूमिका घेतली आहे. या प्रकरणातील सहा प्रमुख आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावले आहेत.
जामीन नाकारण्यात आलेल्यांमध्ये कंपनीच्या संचालक मंडळातील सदस्य सत्यवती पाराशर यांच्यासह आलोक अवधिया, अरविंद पाचपुत्रे, श्रवण कुमार, रवींद्र पोखर्णा आणि मनोजकुमार प्रसाद यांचा समावेश आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आरोपींना मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, १ मार्च रोजी झालेल्या या स्फोटाने संपूर्ण नागपूर जिल्हा हादरला होता. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा सातत्याने वाढत असून आता तो २५ वर पोहोचला आहे. अनेक जखमींची प्रकृती अद्याप गंभीर असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. पुरवार यांच्या न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी झाली. यावेळी बचाव पक्षाच्या वतीने अॅड. प्रकाश जायसवाल आणि अॅड. प्रफुल्ल मोहगावकर यांनी बाजू मांडली. तर सरकारी पक्षाचे अॅड. नितीन तेलगोटे आणि अॅड. मैथिली कालविट यांनी जोरदार विरोध करत कंपनी प्रशासनाने सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप केला.
या स्फोटप्रकरणी तपास यंत्रणा अधिक सक्रिय झाल्या असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.