पोस्ट ऑफिसची खास योजना; सुरक्षित गुंतवणुकीतून दरमहा सुमारे 17 हजारांचे उत्पन्न

    17-Mar-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : नियमित आणि सुरक्षित उत्पन्न मिळवण्याची इच्छा असलेल्या गुंतवणूकदारांसाठी पोस्ट ऑफिसच्या लघुबचत योजना नेहमीच आकर्षक ठरतात. विशेषतः निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी कमी जोखमीच्या योजनांकडे लोकांचा कल वाढत आहे. अशाच योजनांपैकी Senior Citizen Savings Scheme ही एक लोकप्रिय आणि विश्वासार्ह योजना मानली जाते.

आकर्षक व्याजदर आणि सुरक्षितता-
या योजनेत सध्या सुमारे 8.2 टक्के वार्षिक व्याजदर दिला जातो, जो अनेक बँकांच्या फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा अधिक आहे. ही योजना सरकारच्या हमीखाली असल्याने गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित मानली जाते.

या योजनेत किमान 1,000 रुपयांपासून गुंतवणूक करता येते, तर कमाल मर्यादा 30 लाख रुपये आहे. तसेच Income Tax Act Section 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत करसवलत मिळू शकते.

पात्रता आणि सुविधा-
60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतात. याशिवाय VRS घेतलेले 55 ते 60 वयोगटातील नागरिक तसेच संरक्षण दलातील निवृत्त कर्मचारी 50 वर्षांनंतरही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. खाते वैयक्तिक किंवा संयुक्त नावाने उघडण्याची सुविधा उपलब्ध आहे.

दरमहा मिळू शकते 17 हजार रुपयांचे उत्पन्न-
या योजनेचा कालावधी 5 वर्षांचा असून व्याजाची रक्कम दर तीन महिन्यांनी खात्यात जमा होते. उदाहरणार्थ, एखाद्या गुंतवणूकदाराने सुमारे 25 लाख रुपये गुंतवले तर त्यावर तिमाही सुमारे 51,250 रुपये व्याज मिळू शकते. म्हणजेच सरासरी दरमहा जवळपास 17 हजार रुपयांचे उत्पन्न मिळू शकते.

मुदत पूर्ण झाल्यानंतर गुंतवलेली मूळ रक्कम परत मिळते. तसेच ही योजना पुढील 3 वर्षांसाठी वाढवण्याचाही पर्याय उपलब्ध आहे. एकदा गुंतवणूक केल्यानंतर त्या वेळी लागू असलेला व्याजदर संपूर्ण कालावधीत कायम राहतो.