गॅस टंचाईत दिलासा! पीएनजी कनेक्शनवर ५०० रुपयांपर्यंत मोफत गॅस; कंपन्यांच्या आकर्षक ऑफर्स

    17-Mar-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी दिल्ली : जागतिक स्तरावर इंधन दरांमध्ये सुरू असलेल्या चढ-उतारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत केंद्र सरकारने देशातील घरगुती गॅस वापरात बदल घडवण्याचा निर्णय घेतला आहे. एलपीजी सिलेंडरऐवजी पीएनजीचा वापर वाढवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असून यासाठी गॅस कंपन्यांनीही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर्स जाहीर केल्या आहेत.

पीएनजी हा पाईपद्वारे थेट घरापर्यंत पोहोचणारा गॅस असल्याने तो अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर पर्याय मानला जातो. सिलेंडर संपण्याची चिंता, बुकिंगची अडचण किंवा घरात जागेची समस्या या गोष्टींपासून दिलासा मिळतो. तसेच गळती झाल्यास पीएनजी हवेत पटकन मिसळतो, त्यामुळे अपघाताचा धोका तुलनेने कमी असल्याचे मानले जाते.

या पार्श्वभूमीवर Indraprastha Gas Limitedने ३१ मार्च २०२६ पर्यंत नवीन पीएनजी कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना ५०० रुपयांपर्यंत मोफत गॅस देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय Mahanagar Gas Limited आणि GAIL यांनी जोडणी शुल्कात सवलत तसेच हप्त्यांमध्ये पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. Bharat Petroleumकडूनही कॅशबॅक आणि विशेष रिवॉर्ड्सची घोषणा करण्यात आली आहे.

दरम्यान, पेट्रोलियम मंत्रालयाने अलीकडेच जारी केलेल्या परिपत्रकात ज्या घरांमध्ये आधीपासून पीएनजी कनेक्शन आहे, त्यांनी एलपीजी सिलेंडर कनेक्शन परत करण्याचे आवाहन केले आहे. अनेक कुटुंबांकडे दोन्ही सुविधा असल्याने अनावश्यक साठा होतो आणि त्यामुळे गरजूंपर्यंत सिलेंडर पोहोचण्यात अडचणी येतात, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

सरकारच्या नियोजनानुसार, येत्या काही वर्षांत मोठ्या शहरांमध्ये एलपीजीचा वापर मोठ्या प्रमाणात कमी करून पीएनजीचा वापर वाढवण्याचा मानस आहे. यामुळे इंधन वाहतुकीवरील खर्च कमी होईल आणि पर्यावरण संरक्षणालाही चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.