
Image Source:(Internet)
नागपूर : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे रविवारी एक गंभीर घटना घडली, मात्र वैमानिकाच्या वेळीच घेतलेल्या निर्णयामुळे संभाव्य मोठा अपघात टळला. गोव्याकडे जाण्यासाठी तयार असलेल्या IndiGoच्या विमानातून अचानक इंधन गळती सुरू झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
माहितीनुसार, विमान धावपट्टीकडे सरकत असताना पुढील चाकाजवळून इंधन गळत असल्याचे वैमानिकाच्या निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने विमान थांबवले आणि ते सुरक्षितपणे परत पार्किंग क्षेत्रात आणले. त्यानंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितरीत्या खाली उतरविण्यात आले. वैमानिकाच्या या तत्परतेमुळे संभाव्य दुर्घटना टळली.
सध्या संबंधित विमान नागपूर विमानतळावरच उभे ठेवण्यात आले असून त्याची सखोल तांत्रिक तपासणी सुरू आहे. आवश्यक दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत हे विमान उड्डाणासाठी वापरले जाणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेचा परिणाम इतर उड्डाणांवरही झाला. गोव्याच्या फ्लाइटसाठी पर्यायी व्यवस्था करताना कंपनीने मुंबईकडे जाणारे विमान वळविले, त्यामुळे त्या प्रवाशांना मोठ्या विलंबाचा सामना करावा लागला. नियोजित वेळेपेक्षा अनेक तास उशिराने उड्डाण पार पडले.
पर्यायी उड्डाणांची कमतरता असल्याने काही प्रवाशांची गैरसोय झाली. अखेर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या क्षमतेचे विमान बोलावण्यात आले आणि दोन्ही फ्लाइटमधील प्रवाशांना एकत्र करून उशिरा रात्री त्यांच्या गंतव्यस्थानी रवाना करण्यात आले.