Image Source:(Internet)
मुंबई :
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नमो शेतकरी (Namo Shetkari) महासन्मान निधी योजना अंतर्गत प्रलंबित असलेल्या आठव्या हप्त्याला अखेर राज्य सरकारने मंजुरी दिली असून याबाबतचा शासन निर्णय सोमवारी जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठच्या पदवीदान समारंभात शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याबाबत मोठी घोषणा केली होती. पुढील काळात शेतकऱ्यांना दिवसातून १२ तास मोफत वीज देण्याची तयारी सरकार करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. या घोषणेनंतर शेतकरी वर्गात सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता पीएम किसान योजनेच्या हप्त्यानंतर लवकरच जमा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र पीएम किसान सन्मान निधी योजनाच्या 21व्या हप्त्यानंतरही नमोचा हप्ता जमा न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. मागील काही महिन्यांपासून शेतकरी या निधीच्या प्रतीक्षेत होते.
आता सरकारने या हप्त्यासाठी सुमारे १,७७४ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. लवकरच हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात येणार आहे. याआधी सप्टेंबर २०२५ मध्ये सातवा हप्ता वितरित करण्यात आला होता.
माहितीनुसार, राज्यातील सुमारे ६५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार असून एकूण सुमारे १,८९२ कोटी रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे. शासन निर्णयात स्पष्ट केल्याप्रमाणे, सध्या केवळ आठव्या हप्त्याचेच वितरण करण्यात येणार आहे.
निधीअभावी लांबलेल्या या हप्त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र आता सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असून त्यांच्या अपेक्षांना दिलासा मिळाला आहे.