
Image Source:(Internet)
नागपूर : शहरातील गांधीसागर तलावाजवळील इंप्रेस मॉल परिसरात बारावीच्या विद्यार्थ्याने चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून मृत विद्यार्थ्याची ओळख मानेवाडा येथील जवाहरनगर परिसरातील यश सुनील झाडे (१८) अशी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यश हा बारावीचा विद्यार्थी होता. त्याची परीक्षा ११ मार्च रोजीच संपली होती. मात्र त्यानंतरही तो घरच्यांना “पेपर सुरू आहेत” असे सांगून दररोज घराबाहेर पडत होता. त्यामुळे कुटुंबीयांना कोणतीही शंका आली नव्हती.
शनिवारी सकाळीही तो नेहमीप्रमाणे घरातून बाहेर पडला. काही वेळाने तो पुन्हा घरी आला. दुपारी सुमारे दोनच्या सुमारास “खेळायला जातो” असे सांगून तो घराबाहेर पडला; मात्र त्यानंतर तो परतलाच नाही. रात्री उशिरापर्यंत यश घरी न आल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. त्याच्या मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता फोन लागत नव्हता. अखेर नातेवाईकांनी हुडकेश्वर पोलिस ठाण्यात त्याच्या बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.
दरम्यान, गांधीसागर तलावाजवळील इंप्रेस मॉल परिसरात चौथ्या मजल्यावरून एका युवकाने उडी मारल्याचे सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास आले. रक्षकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत युवकाचा मृत्यू झाला होता.
तपासादरम्यान मृतदेहाची ओळख यश सुनील झाडे अशी पटली. या घटनेने परिसरात आणि कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला असून आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.