
बारामती: निवडणूक आयोगाने आज जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमात महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. बारामती आणि राहुरी या दोन्ही जागांसाठी मतदान व मतमोजणीच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.
जाहीर वेळापत्रकानुसार बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर 4 मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जाणार आहेत.
बारामतीचे माजी आमदार अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. त्याचप्रमाणे अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यातील राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर त्या मतदारसंघाची जागाही रिक्त झाली होती. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने देशातील इतर काही राज्यांच्या निवडणुकांचेही वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी येथे 9 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तामिळनाडूमध्ये 23 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडेल. तर पश्चिम बंगालमध्ये 23 एप्रिल आणि 29 एप्रिल अशा दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. या सर्व राज्यांतील मतमोजणी 4 मे रोजी होऊन निकाल जाहीर केले जातील.
दरम्यान, महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी पोटनिवडणुका बिनविरोध होण्याची शक्यताही राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. बारामती मतदारसंघातून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे विरोधक उमेदवार देणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. राहुरीतही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय स्तरावर रंगली आहे.