
Image Source:(Internet)
तेहरान : इराणची राजधानी तेहरान येथे आंदोलन सुरू असतानाच शहरातील अनेक भागांत जोरदार स्फोट झाल्याची घटना घडली. आग्नेय तेहरानमधील जवादियेह परिसर तसेच आझादी चौक आणि आसपासच्या भागात स्फोट झाल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्फोटानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर पसरला आणि आंदोलनासाठी जमलेले नागरिक सैरावैरा पळू लागले.
दरम्यान, कुद्स दिनानिमित्त तेहरानमध्ये अमेरिका आणि इस्रायलविरोधात मोठा मोर्चा काढण्यात आला होता. या आंदोलनात हजारो नागरिक सहभागी झाले होते. आंदोलक घोषणा देत असतानाच अचानक मोठा स्फोट झाल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला.
या मोर्चात इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली लारीजानी यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते. दरवर्षी कुद्स दिनानिमित्त इराण, इराक, लेबनॉन, पाकिस्तान, भारत तसेच युरोपातील अनेक देशांमध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ सभा आणि आंदोलनांचे आयोजन केले जाते.
स्फोटाच्या वेळी त्या ठिकाणी हजारो नागरिक उपस्थित होते. काही वृत्तांनुसार, इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई हेही त्या परिसरात येणार असल्याची चर्चा होती. स्फोटानंतर काही काळ परिसरात धूर आणि गोंधळाचे वातावरण होते.
स्फोटांचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार, स्फोटांपूर्वी इस्रायलने संभाव्य हल्ल्याचा इशारा दिला होता. शुक्रवारी सकाळपासूनच तेहरानच्या आसपास हवाई हल्ल्यांची तीव्रता वाढल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेत किती जण जखमी झाले किंवा जीवितहानी झाली का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. स्फोटानंतर सुरक्षा दलांनी घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचावकार्य सुरू केले आहे. दरम्यान, तेहरान विद्यापीठ परिसरावरही हल्ला होण्याची शक्यता असल्याचा इशारा यापूर्वी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.