खाटू श्याम दर्शनासाठी निघालेल्या नागपूरच्या कुटुंबावर काळाचा घाला; भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

    13-Mar-2026
Total Views |

नागपूर : राजस्थानातील सालासर रोडवर झालेल्या भीषण अपघातात नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील एका कुटुंबावर दुर्दैवी प्रसंग ओढवला. खाटू श्याम बाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या पारसे कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पारसे कुटुंबातील सदस्य खाटु श्याम मंदिर येथे दर्शनासाठी जात होते. प्रवासादरम्यान सालसार वर त्यांच्या टवेरा कारला समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून अपघात अत्यंत भीषण होता.

या अपघातात महादेव पारसे, त्यांची पत्नी कांता पारसे आणि मुलगा घनश्याम पारसे यांचा जागीच मृत्यू झाला. तर चालक मनोज चिंदमवार तसेच आराधना पारसे, पायल पारसे, पल्लवी पारसे, पुनम पारसे, तुषार पारसे आणि पवन बागडे हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या दुर्घटनेची बातमी समजताच कामठीतील कचरीपुरा परिसरात शोककळा पसरली आहे. नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी या घटनेबद्दल तीव्र हळहळ व्यक्त केली. मृतदेहांचे शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर ते पुढील विधीसाठी कामठी येथे आणण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.