घरातच पोर्टेबल सोनोग्राफीने गर्भलिंग तपासणी; तिसरी मुलगी नको म्हणून गर्भपाताचा प्रयत्न!

    13-Mar-2026
Total Views |

जालना : दोन मुली झाल्यानंतर तिसरी मुलगी नको म्हणून एका विवाहितेच्या गर्भाचे लिंगनिदान घरातच पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या साहाय्याने करून जबरदस्तीने गर्भपात करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विवाहितेचा पती, सासू-सासरे तसेच गर्भपात करणाऱ्या टोळीतील कमल तिनगो आणि तिच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नारेगाव परिसरात राहणाऱ्या या विवाहितेला पहिली मुलगी झाल्यानंतर पतीकडून माहेरी पाठवण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्यांदा देखील मुलगी झाल्याने पतीने तिला रुग्णालयातच सोडून दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, नातेवाईकांच्या मध्यस्थीने ती पुन्हा पतीकडे नांदायला गेली.

मुलगा व्हावा या हट्टापोटी ती तिसऱ्यांदा गर्भवती राहिली. गर्भावस्थेच्या पाचव्या महिन्यात २७ फेब्रुवारी २०२६ रोजी तिच्या पतीने दोन पुरुष आणि एक महिलेला घरी आणले. त्यांच्या जवळ पोर्टेबल सोनोग्राफी मशीन होते. विवाहितेने गर्भलिंग तपासणीस तीव्र विरोध केला, मात्र तिला मारहाण करून जबरदस्तीने चाचणी करण्यात आल्याचा आरोप आहे.

टोळीचे निर्घृण कृत्य
सायंकाळी साडेपाचच्या सुमारास विवाहितेला उलटे झोपवून संबंधित महिलेनं तिच्या पोटावर दाब देत गर्भपाताची प्रक्रिया सुरू केली. त्यानंतर शस्त्रक्रिया करून गर्भ काढण्याची तयारी टोळीने सुरू केली होती.

दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच विवाहितेचे वडील घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत तिची प्रकृती गंभीर झाली होती. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत आरोपी कुटुंबीय आणि गर्भपात करणारी टोळी घटनास्थळावरून पसार झाली.

या प्रकरणात जालन्यात यापूर्वी सक्रिय असलेल्या गर्भपात टोळीचाच सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. आरोपींनी मोबाइल फोन बंद करून फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून पुढील तपास सुरू आहे.