
भंडारा : वरठी येथील सनफ्लॅग स्टील कंपनीच्या प्रवेशद्वारावर झालेल्या अपघातात एका सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. कर्तव्यावर असताना भरधाव कारने धडक दिल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या सुरक्षारक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मृत सुरक्षारक्षकाचे नाव सितीन रहांगडाले (२५) असून तो गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील डव्वेटोला गावचा रहिवासी होता. दोन दिवसांपूर्वी तो कंपनीच्या प्रवेशद्वारावर गेट बंद करत असताना भरधाव कारने त्याला जोरदार धडक दिली.
प्रथम त्याला भंडाऱ्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी मृतदेह थेट सनफ्लॅग कंपनीच्या प्रवेशद्वारावर ठेवत न्याय आणि आर्थिक मदतीची मागणी केली. सुरक्षारक्षक पुरवणाऱ्या एजन्सीकडून कुटुंबाला आर्थिक मोबदला व मृत्युपश्चात लाभ देण्याची मागणी करण्यात आली.
सायंकाळपर्यंत तणावाची स्थिती निर्माण झाली होती. अखेर कंपनी प्रशासन आणि संबंधित एजन्सीने आर्थिक मदत व लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भंडारा आणि वरठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.