महाकुंभात प्रसिद्ध झालेल्या ‘मोनालिसा’चा मुस्लिम प्रियकरासोबत प्रेमविवाह; केरळमध्ये केला विवाह

    12-Mar-2026
Total Views |
 
Mona Lisa
 Image Source:(Internet)
केरळ :
प्रयागराज येथे भरलेल्या महाकुंभ मेळ्यात आपल्या सुंदर डोळ्यांमुळे आणि साधेपणामुळे देशभरात चर्चेत आलेली मोनालिसा (Mona Lisa) भोसले हिने अखेर प्रेमविवाह केला आहे. ११ मार्च २०२६ रोजी केरळमधील तिरुवनंतपुरम येथे तिने तिचा प्रियकर फरमान खान याच्यासोबत लग्न केले.
 
मोनालिसाच्या कुटुंबीयांकडून या आंतरधर्मीय विवाहाला विरोध असल्याची माहिती समोर आली आहे. विशेषतः तिचे वडील जय भोसले या नात्याच्या विरोधात होते. मात्र मोनालिसाने आपल्या प्रियकरासोबतच विवाह करण्याचा निर्णय कायम ठेवला. मध्य प्रदेशात लग्नाला विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन या जोडप्याने केरळची निवड केली.
 
लग्नाच्या आधी दोघांनी तिरुवनंतपुरममधील तम्पानूर पोलिस ठाण्यात जाऊन संरक्षणाची मागणी केली होती. त्यानंतर एका मंदिरात दोघांनी एकमेकांना वरमाला घालत विवाहाची विधी पूर्ण केली. संभाव्य विरोध टाळण्यासाठी विवाहस्थळी पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. या विवाहावेळी केरळमधील काही राजकीय नेतेही उपस्थित होते.
 
मोनालिसा ही मध्य प्रदेशातील इंदूरजवळील मंडलेश्वर येथील रहिवासी आहे. प्रयागराजमध्ये झालेल्या महाकुंभ मेळ्यात ती माळा आणि धार्मिक वस्तू विकत होती. याच काळात तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि तिच्या डोळ्यांमुळे ती रातोरात प्रसिद्ध झाली. त्यानंतर तिला चित्रपटात काम करण्याचीही संधी मिळाली.
 
दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी ‘द डायरी ऑफ मणिपुर’ या चित्रपटासाठी मोनालिसाला साइन केले होते. चित्रपटासाठी तिला वाचन-लेखनाचे प्रशिक्षणही दिले जात होते. तसेच तिला साइनिंग अमाऊंट देण्यात आल्याची माहिती समोर आली होती. अलीकडेच तिचे एक व्हिडिओ गाणेदेखील प्रदर्शित झाले होते.
 
दरम्यान, अचानक झालेल्या या विवाहानंतर तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगवर काय परिणाम होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तिरुवनंतपुरममध्ये माध्यमांशी बोलताना मोनालिसाने सांगितले की, “आम्ही गेल्या सहा महिन्यांपासून एकमेकांच्या प्रेमात आहोत.” तर फरमान खानने काही माध्यमांमध्ये मोनालिसा अल्पवयीन असल्याचा दावा फेटाळत ती १८ वर्षांपेक्षा मोठी असल्याचे स्पष्ट केले.