Image Source:(Internet)
मुंबई :
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुंबईतील विधान भवनाला (Vidhan Bhavan) बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ईमेल मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीकडून पाठवलेल्या या धमकीनंतर सुरक्षा यंत्रणा तातडीने अलर्ट मोडवर गेल्या असून पोलिसांनी संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.
धमकीचा संदेश मिळताच मुंबई पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. बॉम्ब शोधक व नाशक पथकासह सुरक्षा दलांनी विधान भवन आणि परिसराची बारकाईने तपासणी सुरू केली आहे. कोणताही संभाव्य धोका टाळण्यासाठी संपूर्ण परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने विधान भवन परिसरात मंत्री, आमदार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने काही काळासाठी इमारतीत येण्या-जाण्यावर निर्बंध घालण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, हा धमकीचा ईमेल नेमका कुठून पाठवण्यात आला याचा माग काढण्यासाठी पोलिसांकडून तांत्रिक तपास सुरू आहे. ही धमकी खोडसाळपणातून देण्यात आली आहे की त्यामागे काही गंभीर कट आहे, याचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा सर्व बाजूंनी चौकशी करत आहेत.