काटोल स्फोट प्रकरण १७ कामगारांचा मृत्यू;कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी; गडकरींची प्रतिक्रिया

    01-Mar-2026
Total Views |
 
Nitin Gadkari
 Image Source:(Internet)
नागपूर:
नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे असलेल्या एसबीएल एनर्जी या दारुगोळा निर्मिती कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात १७ कामगारांना प्राण गमवावे लागल्याची अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे. या दुर्घटनेबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
 
घटनेवर प्रतिक्रिया देताना गडकरी यांनी म्हटले की, “या स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या सर्व कामगारांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. या कठीण प्रसंगी त्यांना धैर्य लाभो, हीच प्रार्थना.”
 
याशिवाय, जखमी कामगारांच्या प्रकृतीची चौकशी करत त्यांनी तातडीने योग्य उपचार मिळावेत, असे निर्देश संबंधित यंत्रणांना दिल्याचे सांगितले. “जखमींनी लवकर बरे व्हावे आणि त्यांना आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत उपलब्ध व्हावी,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
 
दरम्यान, स्फोटानंतर प्रशासन आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य वेगाने सुरू आहे. या अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपास प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.