Image Source:(Internet)
मुंबई:
एप्रिल २०२६ मध्ये महाराष्ट्रातील सात राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ संपत असून या जागांसाठी होणारी निवडणूक (Elections) राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रामुळे भाजपाचं राज्यसभेतील संख्याबळ वाढण्याची शक्यता असून, काही जागांवर बिनविरोध निवडणूक होण्याचीही चर्चा सुरू आहे.
विधानसभेतील सध्याच्या संख्याबळाचा विचार करता महायुतीची स्थिती भक्कम आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला ३७.५ मतांची आवश्यकता असते. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची ताकद मोठ्या प्रमाणात घटली असून याचा थेट परिणाम राज्यसभा निवडीवर होणार आहे.
सध्याच्या गणितानुसार सात जागांपैकी सहा जागा महायुतीच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. यात भाजपाच्या चार, राष्ट्रवादी (अजित पवार गट) एक आणि शिंदेसेनेच्या एका जागेचा समावेश आहे. उर्वरित एक जागा महाविकास आघाडीला मिळू शकते.
२०२४ मधील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं होतं. भाजपाचे १३७, शिंदेसेनेचे ६० आणि राष्ट्रवादीचे ४१ आमदार निवडून आले. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाला २०, काँग्रेसला १६ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ १० जागांवर समाधान मानावं लागलं. या बदललेल्या राजकीय वास्तवाचा प्रभाव आगामी राज्यसभा निवडणुकीवर स्पष्टपणे दिसून येणार आहे.
दरम्यान, शरद पवारांच्या राज्यसभा उमेदवारीवरही चर्चा रंगू लागली आहे. “शरद पवारांसारखा अनुभवी नेता दिल्लीत असणं महाराष्ट्रासाठी आवश्यक आहे. ते महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहेत,” असं सांगत संजय राऊत यांनी पवारांनी पुन्हा राज्यसभेची निवडणूक लढवावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीकडे पवारांना निवडून आणण्याइतकी ताकद असल्याचाही दावा त्यांनी केला आहे.
महाराष्ट्रात राज्यसभेच्या एकूण १९ जागा असून सध्या त्यातील १२ जागा एनडीएकडे तर सात जागा महाविकास आघाडीकडे आहेत. येत्या २ एप्रिल २०२६ रोजी शरद पवार, फौजिया खान, प्रियंका चर्तुवैदी, रजनी पाटील, धैर्यशील पाटील, भागवत कराड आणि रामदास आठवले यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये होणारी राज्यसभा निवडणूक महाराष्ट्राच्या तसेच राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहे.