युद्ध तुम्ही सुरू केले, आम्ही संपवू;इराणवरील संयुक्त हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा कठोर इशारा

    28-Feb-2026
Total Views |
 
Donald Trump
 Image Source:(Internet)
तेहरान/वॉशिंग्टन :
इराणवर (Iran) अमेरिके आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई केल्याची माहिती समोर आल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, या हल्ल्यात इराणमधील काही महत्त्वाच्या सरकारी इमारतींना लक्ष्य करण्यात आले असून एका वरिष्ठ लष्करी कमांडरचा मृत्यू झाल्याचेही सांगितले जात आहे.
 
या कारवाईनंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांनी तीव्र प्रतिक्रिया देत कठोर शब्दांत इशारा दिला. “आम्ही आमचे वचन पूर्ण केले आहे. काही वेळापूर्वीच इराणवर मोठी कारवाई करण्यात आली. इराणची क्षेपणास्त्र यंत्रणा उद्ध्वस्त केली जाईल,” असे त्यांनी म्हटले. “युद्ध तुम्ही सुरू केले, आम्ही ते संपवू,” असा थेट इशाराही त्यांनी दिला.
 
गेल्या काही दिवसांपासून इराणला सातत्याने कारवाईचा इशारा दिला जात होता. अखेर संयुक्त लष्करी ऑपरेशनला सुरुवात झाल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. “लोकांची सुरक्षा हे आमचे सर्वोच्च ध्येय आहे,” असे ते म्हणाले.
 
हल्ल्यांमध्ये इराणच्या राष्ट्रपती भवनासह काही प्रशासकीय ठिकाणांना लक्ष्य केल्याची चर्चा आहे. अमेरिकन सैन्य थेट कारवाईत उतरल्याने संघर्षाचे स्वरूप अधिक गंभीर बनले आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेच्या या संयुक्त हालचालीमुळे पश्चिम आशियातील तणाव शिगेला पोहोचला आहे.
 
दरम्यान, इराण या हल्ल्याला कशा प्रकारे प्रत्युत्तर देते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. कोणते देश इराणच्या पाठीशी उभे राहतात आणि या संघर्षाचा पुढील टप्पा काय असेल, याबाबत अनिश्चितता कायम आहे.
 
काही दिवसांपूर्वीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायल दौरा केला होता, त्यामुळे या घडामोडींना अधिक राजनैतिक संदर्भ प्राप्त झाला आहे. सध्याच्या परिस्थितीत पश्चिम आशियात व्यापक संघर्ष भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.