उद्धव ठाकरे यांना धक्का; डोंबिवलीत ठाकरे गटाचे पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

    28-Feb-2026
Total Views |
 
Thackeray group
 Image Source:(Internet)
डोंबिवली :
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर राजकीय समीकरणांना वेग आला असून ठाकरे गटाला (Thackeray group) आणखी एक मोठा धक्का बसला आहे. डोंबिवली येथे शिवसेना ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे.
 
नगर परिषद, नगर पंचायती, महापालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपने आघाडी घेतली, तर शिवसेना शिंदे गटानेही लक्षणीय यश मिळवले. या पार्श्वभूमीवर विविध पक्षांमध्ये पक्षांतराचे सत्र सुरूच आहे. त्याचा फटका ठाकरे गटालाही बसत असल्याचे चित्र आहे.
 
डोंबिवलीत खासदार Shrikant Shinde आणि आमदार राजेश मोरे यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश पार पडला. ठाकरे गटाचे विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख आणि अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला. त्यामुळे डोंबिवलीतील संघटनात्मक ताकदीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये अस्वस्थता वाढली होती. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेते आणि कार्यकर्ते शिंदे गटात तसेच भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे दिसून आले. सततच्या या पक्षांतरामुळे ठाकरे गटासमोर संघटना टिकवण्याचे आणि कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
 
डोंबिवलीतील या ताज्या पक्षप्रवेशामुळे आगामी काळात शिवसेना ठाकरे गटाची रणनीती काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.