धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तर कार्यक्रम खल्लास;जरांगे पाटलांविरोधात पोस्टमुळे खळबळ

    28-Feb-2026
Total Views |
 
Dhananjay Munde Jarange Patil
 Image Source:(Internet)
बीड/परळी :
मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात सोशल मीडियावर करण्यात आलेल्या एका आक्षेपार्ह पोस्टमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. ही पोस्ट कथितपणे धनंजय मुंडे (Dhananjay Munde)  यांचे निकटवर्तीय आणि परळी बाजार समितीचे माजी सभापती गोविंद फड यांनी केल्याची चर्चा आहे.
 
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील यांनी राज्यभर आंदोलन उभारले होते. अनेकदा उपोषण करत त्यांनी सरकारवर दबाव आणला. अखेरीस राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयानंतर मराठा आणि ओबीसी समाजामध्ये तणाव वाढल्याचे चित्र दिसले. ओबीसी समाजातील अनेक नेत्यांनी या भूमिकेला विरोध दर्शवला होता. त्यावेळी जरांगे पाटील यांनी विशेषतः धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.
 
दरम्यान, बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड सध्या कारागृहात असल्याची माहिती आहे. या मुद्द्यावरूनही जरांगे पाटील यांनी मुंडेंवर आरोप केले होते. त्यानंतर स्वतःला जीवे मारण्याचा कट रचला गेल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला होता. या संदर्भात अमोल खुणे याला संशयित म्हणून अटक झाली होती; सध्या तो जामिनावर बाहेर आहे.
 
अशातच सोशल मीडियावर समोर आलेल्या पोस्टमध्ये “धनंजय मुंडे यांच्या केसालाही धक्का लागला तर कार्यक्रम खल्लास… जरांगे, सुरेश धस भंडारा लावून बोलतोय,” असा मजकूर इंग्रजीत टाकण्यात आल्याचे सांगितले जाते. या पोस्टमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
 
सदर पोस्टमुळे मराठा-ओबीसी वाद पुन्हा पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.