Image Source:(Internet)
मुंबई :
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनाला एक महिना उलटला असला तरी त्यांच्या विमान अपघाताबाबतचे वाद थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. आमदार Rohit Pawar यांनी हा अपघात संशयास्पद असल्याचे म्हणत नागरी उड्डाण महासंचालनालय (DGCA) तसेच संबंधित विमान कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता रोहित पवारांवर अप्रत्यक्ष टीका केली.
खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस म्हणाले, “अजित पवारांच्या विमान अपघातासारख्या गंभीर प्रकरणावर कोणीही बेफाम वक्तव्य करू नये. अशा वेळी अफवा पसरवणे किंवा अंदाजांवर आधारित आरोप करणे योग्य नाही.” त्यांनी पुढे सांगितले, “ही अत्यंत संवेदनशील घटना आहे. दिवंगत नेत्याचा सन्मान आणि त्यांच्या कुटुंबियांची प्रतिष्ठा जपणे हे सर्वांचे कर्तव्य आहे.”
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “रोहित पवार माझ्याकडे आले होते आणि त्यांनी काही मुद्दे मांडले. त्यांनी दिलेल्या निवेदनासोबत माझे पत्र जोडून मी DGCA कडे सखोल चौकशीची मागणी करणार आहे. मात्र, या प्रकरणात अनावश्यक राजकीय वातावरण निर्माण होऊ नये.”
दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाबाबत विचारले असता फडणवीस यांनी स्पष्ट केले की हा निर्णय राष्ट्रवादी पक्षाचा (NCP) चा अंतर्गत निर्णय होता. “त्या नियुक्तीत आमच्या पक्षाचा कोणताही हस्तक्षेप नव्हता. NCP च्या नेत्यांनी निर्णय घेऊन आम्हाला कळवले आणि त्यांच्या विनंतीनुसार आम्ही तो स्वीकारला,” असे त्यांनी सांगितले.
अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत असून, विमान अपघाताच्या चौकशीची मागणी आणि त्यावरून सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप यामुळे राजकीय वातावरण अधिकच ढवळून निघाले आहे.