Image Source:(Internet)
काकीनाडा :
आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) काकीनाडा जिल्ह्यातील फटाक्यांच्या उत्पादन युनिटमध्ये झालेल्या भीषण स्फोटानंतर उसळलेल्या आगीत किमान १८ कामगारांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
समरलकोटा मंडळातील वेतलापालेम येथे असलेल्या ‘सूर्या फायर वर्क्स’ कारखान्यात अचानक स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की कारखान्याची इमारत कोसळून मोठे नुकसान झाले. आसपासच्या भागातही धुराचे लोट पसरल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली.
अपघाताच्या वेळी सुमारे २० कामगार कामावर असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाने दिली आहे. घटनास्थळी अग्निशमन दल आणि बचाव पथके तात्काळ दाखल झाली असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांचा शोध सुरू आहे. अनेक जण गंभीररीत्या भाजले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. काहींची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या घटनेवर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घटनेचा सविस्तर अहवाल मागवला असून अपघाताच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच बाधित कुटुंबांना तातडीने मदत आणि जखमींना उत्तम उपचार मिळावेत, असे निर्देश त्यांनी दिले.
या भीषण दुर्घटनेनंतर औद्योगिक सुरक्षेच्या उपाययोजनांवर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले असून, प्रशासनाने दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.