Image Source:(Internet)
जळगाव :
राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत (Ladki Bhahin Yojana) महिलांना दरमहा १५०० रुपये मानधन देण्याची तरतूद करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या योजनेला सुरुवातीला मोठा प्रतिसाद मिळाला होता. अर्ज मंजूर झाल्यानंतर अनेक महिलांच्या खात्यात रक्कम जमा झाली; मात्र नंतर अर्जांची सखोल छाननी आणि ई-केवायसीची अट लागू कण्यात आली.
दरम्यान, ई-केवायसी पूर्ण करूनही हप्ते जमा होत नसल्याची तक्रार अनेक महिलांनी केली आहे. जळगाव येथे महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यालयात याच मुद्द्यावरून महिलांनी गर्दी करत संताप व्यक्त केला. आपली समस्या मांडण्यासाठी गेलेल्या महिलांना समाधानकारक उत्तर न मिळाल्याचा आरोप करण्यात आला. उलट कर्मचाऱ्यांनी अरेरावी केल्याचेही काही महिलांचे म्हणणे आहे.
गोंधळ वाढत असल्याचे लक्षात येताच कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी महिलांना बाहेर काढत मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावल्याची घटना घडली. सुमारे दोन तास हा प्रकार सुरू होता. संतप्त महिलांनी आपली व्यथा मांडणारे व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केले असून ते व्हायरल होत आहेत.
जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून महिलांनी कार्यालयात धाव घेतली होती. गेल्या काही महिन्यांपासून ई-केवायसी करूनही हप्ते मिळत नसल्याची ओरड सुरू असल्याने प्रशासनाने याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी महिलांकडून करण्यात येत आहे.