नागपूर हादरलं; विद्यार्थिनीच्या हालचालींमुळे बारावी पेपरफुटीचा मोठा भंडाफोड

    28-Feb-2026
Total Views |
 
Class 12 paper leak
 Image Source:(Internet)
नागपूर:
बारावीच्या परीक्षेदरम्यान एका विद्यार्थिनीच्या (Student) संशयास्पद हालचालींमुळे मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे. परीक्षेच्या वेळेत वारंवार स्वच्छतागृहात जाणाऱ्या या विद्यार्थिनीवर देखरेख ठेवण्यात आल्यानंतर तिच्या मोबाईलमध्ये गणिताच्या प्रश्नपत्रिकेचे फोटो आढळून आले. या घटनेनंतर तपासाचा वेग वाढला असून रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रानंतर गणिताचाही पेपर आधीच बाहेर पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईलमधील डिलीट केलेला डेटा पुनर्प्राप्त केल्यानंतर २१ फेब्रुवारी रोजीच गणिताची प्रश्नपत्रिका काही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचे समोर आले. व्हॉट्सअ‍ॅप चॅट, पीडीएफ फाईल्स आणि स्क्रीनशॉट्समधून प्रश्नपत्रिका आणि सुचवलेली उत्तरे शेअर झाल्याचे पुरावे मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. यापूर्वी रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्राच्या पेपरबाबतही अशाच प्रकारचे धागेदोरे सापडले होते.
 
तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. काही परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिकांच्या पाकिटांमध्ये २५ ऐवजी २४च प्रती आढळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पेपरफुटी आणि प्रश्नपत्रिका कमी पडण्यामध्ये काही संबंध आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
 
या प्रकरणात खासगी कोचिंग क्लासशी संबंधित व्यक्तींसह दोन शिक्षकांना ताब्यात घेण्यात आले आहे. आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यातील एक जण अल्पवयीन असल्याचे सांगितले जात आहे. ‘XII’ नावाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपद्वारे प्रश्नपत्रिका आणि संभाव्य उत्तरे शेअर केल्याचा संशय तपासात व्यक्त करण्यात आला आहे.
 
दरम्यान, नागपूर विभागीय शिक्षण मंडळाने हा प्रकार संघटित पेपरफुटी नसून काही व्यक्तींनी केलेला गैरप्रकार असल्याचा दावा केला आहे. मंडळाकडून स्वतंत्र चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले असून दोषींवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
 
सिव्हिल लाईन्स परिसरातील परीक्षा केंद्रावरून या प्रकरणाची सुरुवात झाली. विद्यार्थिनीच्या मोबाईलमधील प्रश्नपत्रिका आढळल्यानंतर तपासाचा फास आवळत गेला आणि एकामागून एक नावे समोर येऊ लागली. सलग तीन विषयांचे पेपर बाहेर पडल्याने पालक व विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि अस्वस्थता पसरली आहे.
 
या संपूर्ण प्रकरणामागील मुख्य सूत्रधार कोण, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष तपास पथक (SIT) नेमले असून तपास वेगाने सुरू आहे. शिक्षण व्यवस्थेतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून येत्या काळात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.