दक्षिण आफ्रिकेलाही ‘त्याची’च धास्ती

Image Source:(Internet)
टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धा रंगात आली असून सुपर 8 फेरीतील समीकरणे आता अधिकच चुरशीची झाली आहेत. पहिल्याच सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव स्वीकारावा लागला आणि उपांत्य फेरीचा मार्ग कठीण झाला. मात्र त्यानंतर घडलेल्या दोन महत्त्वाच्या घडामोडींमुळे भारतीय संघाच्या आशा पुन्हा जिवंत झाल्या.
दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडीजचा पराभव केल्याने गटातील गुणतालिका बदलली, तर भारताने झिंबाब्वेवर मात करत स्पर्धेत पुनरागमन केले. त्यामुळे उपांत्य फेरीसाठी भारत अद्याप शर्यतीत कायम आहे. आता भारतासमोर सर्वात मोठं आव्हान वेस्ट इंडीजचं आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडीज या निर्णायक लढतीत जो संघ विजयी होईल, तो थेट उपांत्य फेरीत प्रवेश करणार आहे.
फाफ डु प्लेसिसचे भाकीत-
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार Faf du Plessis याने मोठं भाकीत व्यक्त केलं आहे. त्याच्या मते, यंदाच्या ICC Men's T20 World Cup स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होईल.
एका कार्यक्रमात बोलताना फाफ म्हणाला, “भारतीय संघ अत्यंत संतुलित आणि मजबूत आहे. त्यांची फलंदाजीची खोली आणि गोलंदाजीचा अचूकपणा हे त्यांचे मोठे बलस्थान आहे. मोठ्या सामन्यांचा अनुभव त्यांच्याकडे आहे. त्यामुळे ते फायनलपर्यंत नक्की पोहोचू शकतात. मात्र अंतिम सामन्यात यावेळी दक्षिण आफ्रिका बाजी मारील.”
फाफच्या या वक्तव्यामुळे क्रिकेट वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भारताची सर्वात मोठी ताकद म्हणजे दबावाच्या क्षणीही संघाची एकजूट आणि निर्णायक क्षणी सामने फिरवण्याची क्षमता, असेही त्याने नमूद केले.
समीकरणे अजूनही खुली-
सध्या सुपर 8 फेरीत दक्षिण आफ्रिकेने दोन्ही सामने जिंकत उपांत्य फेरीकडे भक्कम पाऊल टाकले आहे. भारताने एक विजय आणि एक पराभव नोंदवला आहे. भारत आणि वेस्ट इंडीज यांचे समान गुण असल्याने पुढील सामना ‘करो या मरो’ ठरणार आहे.
वेस्ट इंडीजने आतापर्यंत आक्रमक क्रिकेट खेळत आपली ताकद दाखवली आहे. त्यामुळे भारतासाठी हा सामना सोपा नसेल. मात्र संघातील अनुभवी खेळाडू आणि संतुलित संघरचना हीच भारताची खरी जमेची बाजू मानली जात आहे.
आता सर्वांचे लक्ष भारत–वेस्ट इंडीज सामन्याकडे लागले आहे. या लढतीत कोण वरचढ ठरणार आणि फाफ डु प्लेसिसचे भाकीत कितपत खरे ठरणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.