Image Source:(Internet)
नागपूर :
कळमना (Kalamana) भागातील मिनीमाता नगर परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे. घरासमोर खेळत असताना उघड्या पाण्याच्या टाकीत पडून अवघ्या दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना २४ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. या प्रकरणी कळमना पोलिसांनी संबंधित शेजाऱ्याला अटक केली आहे.
मृत बालकाची ओळख कुश राजेंद्र पटेल (वय २) अशी झाली आहे. दुपारच्या सुमारास तो घराजवळ खेळत होता. काही वेळाने तो दिसेनासा झाल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी घाबरून परिसरात शोध सुरू केला. शोधादरम्यान शेजारी राहणारे गुड्डू उर्फ इमामुद्दीन मोहम्मद अझरुद्दीन शहा (वय ४२) यांच्या घराबाहेरील जिन्याखाली असलेल्या पाण्याच्या उघड्या टाकीत तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आला.
कुटुंबीयांनी तत्काळ त्याला बाहेर काढत प्रथम स्थानिक पारेख क्लिनिकमध्ये नेले. तेथून पुढील उपचारासाठी वर्धमान नगर येथील डॉ. पुगलिया रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेप्रकरणी बालकाचे वडील जितेंद्र शंकर पटेल (वय ३७) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्राथमिक तपासात संबंधित शेजाऱ्याने पाण्याची टाकी कोणत्याही प्रकारचे झाकण किंवा सुरक्षितता उपाय न करता उघडी ठेवली होती, अशी बाब समोर आली आहे. याच निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
पोलीस उपनिरीक्षक हनुमंत इंगळे यांनी भारतीय न्याय संहिता कलम १०६(१) अंतर्गत गुन्हा नोंदवत आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. निवासी भागात उघड्या पाण्याच्या टाक्या किंवा धोकादायक रचना सुरक्षित न ठेवल्यास किती मोठी दुर्घटना घडू शकते, याची ही वेदनादायक आठवण ठरली आहे.