Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अभिनेते विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मनदाना यांना त्यांच्या विवाहपूर्व विशेष शुभेच्छा पाठवल्या आहेत. २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या त्यांच्या भव्य विवाह सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी अभिनंदनाचा संदेश पाठवून या नवदांपत्याला उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद दिले.
पंतप्रधानांनी आपल्या संदेशात विवाह हा विश्वास, परस्पर आदर आणि सहजीवनाच्या सुंदर नात्यावर उभा असलेला नवा प्रवास असल्याचे म्हटले आहे. या नव्या आयुष्यात दोघांनाही आनंद, उत्तम आरोग्य आणि यश लाभो, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
विजय आणि रश्मिका यांच्या लग्नाची चर्चा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रंगत आहे. चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आपल्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीमुळे आणि लोकप्रिय चित्रपटांमुळे चर्चेत असलेली ही जोडी विवाह सोहळा खासगी ठेवणार असून, केवळ कुटुंबीय आणि निकटवर्तीय मित्रांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार आहे.
पंतप्रधानांकडून मिळालेल्या शुभेच्छांमुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, चित्रपटसृष्टीसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.