नाशिक–अक्कलकोट प्रवास होणार सुपरफास्ट;‘हरितक्षेत्र’ द्रुतमार्गाला वेग

    25-Feb-2026
Total Views |
 
Nashik-Akkalkote
 Image Source:(Internet)
नाशिक :
बहुचर्चित नाशिक–अक्कलकोट (Nashik-Akkalkote) हरितक्षेत्र द्रुतमार्ग प्रकल्पाबाबत महत्त्वाची प्रगती झाली असून National Highways Authority of India (NHAI) ने पुढील दोन वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. जमीन संपादन प्रक्रियेला गती देण्यात आल्याने दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाला आता वेग येण्याची चिन्हे आहेत.
 
जमीन संपादनाला वेग-
नाशिक जिल्ह्यातील उर्वरित १०७.३३ हेक्टर जमीन तातडीने संपादित करण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. बाधित शेतकरी व नागरिकांकडून हरकती व सूचना स्वीकारण्यासाठी २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. प्राप्त आक्षेपांवर सक्षम अधिकाऱ्यांकडून वेळेत निर्णय घेतला जाणार असून, प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
 
मूळ आराखड्यात बदल-
केंद्र सरकारने प्रारंभी सुरत ते चेन्नई असा सुमारे १,२०० किमी लांबीचा हरितक्षेत्र महामार्ग उभारण्याची संकल्पना मांडली होती. मात्र महाराष्ट्रातील काही भागात झालेल्या शेतकरी आंदोलनांमुळे सूरत–नाशिक टप्पा रद्द करण्यात आला. त्यानंतर नाशिकपासून दक्षिणेकडील टप्प्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.
 
हा मार्ग आडगाव येथून सुरू होऊन अहिल्यानगर, धाराशिव आणि सोलापूर मार्गे अक्कलकोट येथे पोहोचणार आहे.
 
३० गावांतून जाणार द्रुतमार्ग-
नाशिक जिल्ह्यातील नाशिक, निफाड आणि सिन्नर तालुक्यांतील एकूण ३० गावांमधून हा महामार्ग जाणार आहे. या टप्प्यासाठी ३८७.३३ हेक्टर जमीन आवश्यक असून त्यापैकी सुमारे २८० हेक्टर जमीन आधीच संपादित झाली आहे.
 
नाशिक तालुका : आडगाव, विंचूरगवळी
निफाड तालुका : दारणासांगवी, सावळी, चाटोरी, चेहडी, हेदारणा, लालपाडी, रामनगर, पिंपळगाव निपाणी, तळवाले
सिन्नर तालुका : देशवंडी, पाटपिंपरी, बारनाव पिंपरी, निमगाव सिन्नर, गुळवंच, देवपूर, खोपडी, फर्दापूर, धारणगाव, भोकणी, पांगरी, फुलेनगर, वावी, थोडेवाडी, कहांडलवाडी
 
प्रकल्पाची वैशिष्ट्ये-
सुमारे ३७४ किमी लांबीच्या या द्रुतमार्गात ७० मीटर रुंदीचा १५२ किमी आणि ६० मीटर रुंदीचा २२२ किमी असा मार्ग असेल. दऱ्याखोऱ्यांमधून ५.६ किमीचा विशेष तांत्रिक भाग उभारला जाणार आहे. तसेच २७ मोठे पूल आणि १६४ लहान पूल व जोडरस्ते या प्रकल्पात समाविष्ट असतील.
 
उत्तर–दक्षिण संपर्काला चालना-
द्रुतमार्ग पूर्ण झाल्यानंतर राज्यातील उत्तर–दक्षिण संपर्क अधिक मजबूत होणार असून औद्योगिक आणि कृषी वाहतुकीला मोठी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेषतः नाशिक आणि मराठवाडा–पश्चिम महाराष्ट्र दरम्यानचा प्रवास वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.