Image Source:(Internet)
कछार (आसाम) :
राज्यातील कछार जिल्ह्यातील सिलचर परिसरात एका २८ वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार (Gang rape) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तरुणी आपल्या मित्रासोबत कारने फिरण्यासाठी गेली असताना काही अज्ञात व्यक्तींनी कार अडवून दोघांनाही मारहाण केली आणि त्यानंतर तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.
ही घटना कछार जिल्हा येथील सिलचर बायपास रोड परिसरात घडल्याची माहिती समोर आली आहे. पीडित तरुणी आणि तिचा मित्र रस्त्याच्या कडेला थांबले असताना एका कारमधून आलेल्या सात जणांनी त्यांना लक्ष्य केले. आधी दोघांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी तरुणीवर आळीपाळीने अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
इतकेच नव्हे तर आरोपींनी पीडितेच्या बँक खात्यातून जबरदस्तीने १० हजार रुपये ट्रान्सफर करून घेतल्याचेही समोर आले आहे. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
पीडितेने धैर्य दाखवत स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सातही आरोपींविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली असून उर्वरित पाच जणांचा शोध सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवा न पसरवण्याचे आवाहन करत तपास वेगाने सुरू असल्याचे सांगितले आहे.