Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
देशाची राजधानी दिल्लीचे (Delhi) नाव बदलून ‘इंद्रप्रस्थ’ करण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे (Bharatiya Janata Party) खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून केली आहे. राजधानीच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा उल्लेख करत त्यांनी नामांतराची आवश्यकता अधोरेखित केली आहे.
पत्रात काय नमूद?
खासदार खंडेलवाल यांनी पत्रात म्हटले आहे की, ‘दिल्ली’ हे नाव शहराच्या इतिहासातील एका मर्यादित कालखंडाचे प्रतिनिधित्व करते; मात्र या शहराचा वारसा अधिक प्राचीन आणि व्यापक आहे. त्यामुळे ‘इंद्रप्रस्थ’ हे नाव पुनर्स्थापित केल्यास आधुनिक भारताची राजधानी तिच्या प्राचीन संस्कृतीशी पुन्हा जोडली जाईल. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची राजधानी मानवजातीच्या सर्वात प्राचीन सांस्कृतिक परंपरांवर आधारित असल्याचे ते प्रतीक ठरेल, असेही त्यांनी नमूद केले आहे.
प्राचीन इतिहासाशी नाळ-
पत्रात पुढे इंद्रप्रस्थचा उल्लेख प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आढळतो आणि ते पांडवांची राजधानी म्हणून ओळखले जात असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे राजधानीचे नाव ‘इंद्रप्रस्थ’ केल्यास भारताच्या ऐतिहासिक ओळखीला आणि सांस्कृतिक सातत्याला बळकटी मिळेल, असा दावा करण्यात आला आहे.
सांस्कृतिक वारशाला चालना?
दिल्लीचे नामांतर केल्यास देशाच्या प्राचीन परंपरांचा सन्मान होईल तसेच नव्या पिढीला भारताच्या समृद्ध इतिहासाची ओळख अधिक ठळकपणे होईल, असे मत खासदारांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, या मागणीवर केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट झालेली नाही; मात्र या पत्रामुळे राजधानीच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.