अरिजीत सिंगचा यू-टर्न? नव्या पोस्टमुळे पुनरागमनाच्या चर्चा रंगल्या

    25-Feb-2026
Total Views |
 
Arijit Singh
 Image Source:(Internet)
मुंबई :
लोकप्रिय पार्श्वगायक अरिजीत सिंग (Arijit Singh) याने काही आठवड्यांपूर्वी प्लेबॅक गायनातून निवृत्ती जाहीर करून चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. मात्र आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केलेल्या त्याच्या नव्या भावनिक संदेशामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. त्याच्या एका सूचक वाक्यामुळे तो आपला निर्णय बदलणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
 
निवृत्तीची घोषणा केल्यानंतर सुमारे महिनाभराने अरिजीतने आपल्या श्रोत्यांशी थेट संवाद साधत एक सविस्तर पोस्ट लिहिली. “हा संदेश फक्त माझ्या श्रोत्यांसाठी आहे. तुम्ही माझे श्रोते नसाल तर कृपया पुढे स्वाइप करा,” अशा शब्दांत त्याने सुरुवात केली. या कठोर जगात मिळालेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत “मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो,” असे तो म्हणाला. या ओळींमधून त्याचा भावनिक सूर स्पष्ट जाणवत होता.
 
त्याने स्पष्ट केले की, नवीन असाइनमेंट स्वीकारणे थांबवले असले तरी आधीपासून अनेक गाणी आणि प्रकल्प प्रलंबित आहेत. ती पूर्ण करण्याची जबाबदारी अद्याप बाकी असून पुढील काळात ही गाणी टप्प्याटप्प्याने प्रदर्शित केली जातील, असे त्याने नमूद केले. त्यामुळे निवृत्ती म्हणजे तत्काळ गायब होणे नसून, चाहत्यांना अजूनही त्याचा आवाज ऐकायला मिळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
 
आपल्या पोस्टमध्ये त्याने चाहत्यांना संयम बाळगण्याचा सल्ला देत सोशल मीडियापासून थोडे दूर राहा, वाचन करा, प्रेम करा आणि ध्यानधारणा करा, असेही आवाहन केले. मात्र “पुढे काय होईल कोणाला माहित?” या एका वाक्याने सर्वांचे लक्ष वेधले. याच वाक्यामुळे तो निवृत्तीचा निर्णय मागे घेऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
 
विशेष म्हणजे 28 जानेवारी रोजी त्याने प्लेबॅक सिंगिंगमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये निराशा पसरली होती. आता नव्या पोस्टमुळे मात्र पुनरागमनाच्या चर्चांना पुन्हा हवा मिळाली आहे. अरिजीतचा अंतिम निर्णय काय असेल, हे येणारा काळच ठरवेल; पण त्याच्या चाहत्यांच्या आशा पुन्हा एकदा उंचावल्या आहेत.