अवकाळी पावसाचा राज्यात धुमाकूळ; मराठवाडा-विदर्भातील शेतकरी हवालदिल

    24-Feb-2026
Total Views |
 
Unseasonal rains Farmers
 Image Source:(Internet)
तुळजापूर:
राज्यातील हवामानाने अचानक पलटी घेतल्याने मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पाऊस (Unseasonal rains) व गारपिटीचा जबर फटका बसला आहे. मागील दोन दिवसांत झालेल्या या बदलामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पीक हिरावले गेले असून कापणीच्या उंबरठ्यावर असलेली पिके अक्षरशः जमिनीवर कोसळली आहेत. उत्तरेकडून येणारे उष्ण वारे आणि वातावरणातील दाब-परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या प्रणालींमुळे ही स्थिती उद्भवली असल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. पुढील २४ तास परिस्थिती कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
 
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर आणि कळंब परिसरात झालेल्या अवकाळी सरींनी द्राक्षबागांचे मोठे नुकसान केले. आधीच बाजारभावाच्या चिंतेत असलेल्या द्राक्ष उत्पादकांवर आता रोगराई आणि गुणवत्तेच्या घटीचे संकट ओढवले आहे. उत्पादनात मोठी घट येण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
 
वर्धा जिल्ह्यात गारांसह कोसळलेल्या पावसाने टरबूज पिक पूर्णपणे आडवे झाले. उन्हाळ्यात चांगली मागणी असलेल्या या पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. गहू आणि हरभरा पिकांनाही या वादळी पावसाचा तडाखा बसला आहे.
 
परभणी आणि बीड जिल्ह्यांतही रिमझिम सरींसह आलेल्या जोरदार वाऱ्यांमुळे गहू, ज्वारी, हरभरा आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कापणीसाठी सज्ज असलेली पिके आडवी पडल्याने उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पंचनामे तातडीने करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
 
विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात राळेगाव, मारेगाव, महागाव, उमरखेड आणि पुसद भागांत अवकाळी पावसाने रब्बी हंगामावर घाला घातला आहे. खरीप हंगामातील नुकसानीतून सावरत असतानाच पुन्हा एकदा निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी संकटात सापडले आहेत.
 
दरम्यान नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्येही हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली. आंब्याचा मोहोर, हरभरा, तूर, ज्वारी आणि भाजीपाला पिकांवर त्याचा परिणाम झाल्याचे प्राथमिक अहवालातून समोर आले आहे.
 
अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटाच्या छायेत गेले असून शासनाने तातडीने मदतीची घोषणा करावी, अशी एकमुखी मागणी होत आहे.