एकनाथ शिंदे पुन्हा कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

    24-Feb-2026
Total Views |
 
Eknath Shinde Sanjay Raut
 Image Source:(Internet)
पुणे :
शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारे विधान केले आहे. एकनाथ शिंदे पुन्हा कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत आणि त्यांना तशी संधी भाजप देणार नाही, असा थेट दावा त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील राजकीय समीकरणांबाबत नव्याने चर्चा रंगू लागली आहे.
 
राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे हे आमचे अनेक वर्षांचे सहकारी होते. मात्र शिवसेना फोडण्यासाठीच त्यांना मुख्यमंत्री करण्यात आले. हा निर्णय कोणत्याही वैचारिक भूमिकेवर आधारित नव्हता, तर तो केवळ राजकीय डाव होता, असा आरोप त्यांनी केला. सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी भाजपने दाखवली, अशी टीकाही त्यांनी केली.
 
न्यायव्यवस्थेबाबत बोलताना राऊत यांनी काही न्यायाधीश सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेला पूरक पद्धतीने वागत असल्याचा आरोप केला. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेथील सर्वोच्च न्यायालयावर केलेल्या टीकेचा संदर्भ देत त्यांनी न्यायसंस्थेतील कथित पक्षपाताचा मुद्दा उपस्थित केला.
 
भाजपाकडे ठोस राजकीय, सामाजिक किंवा सांस्कृतिक विचारसरणी नाही, असा आरोप करत राऊत म्हणाले की विचारांची लढाई विचारांनीच लढली जाते. मात्र दबाव, चौकशा आणि कारवाईचा धाक दाखवून नेत्यांना पक्षांतरास भाग पाडले जाते. यावेळी त्यांनीअजित पवार,हसन मुश्रीफ आणि नवाब मलिक यांचा उल्लेख केला.
 
पुण्यातील हणमंत पवार मारहाण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केले. लोकशाहीची मूल्ये जपण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. राऊत यांच्या या आक्रमक वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.