-पाहुण्यांसाठी कडक नियम
Image Source:(Internet)
मुंबई :
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील चर्चित जोडी विजय (Vijay) देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या लग्नाच्या चर्चा आता शिगेला पोहोचल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 26 फेब्रुवारी 2026 रोजी राजस्थानातील उदयपूर येथे दोघांचा विवाहसोहळा पार पडण्याची शक्यता आहे. मात्र संपूर्ण कार्यक्रम अत्यंत खाजगी स्वरूपात होणार असून आयोजकांकडून ठिकाण आणि पाहुण्यांविषयी गोपनीयता पाळली जात आहे.
लग्नासाठी उदयपूरपासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर अरावली पर्वतरांगांमध्ये वसलेल्या आलिशान आणि एकांत रिसॉर्टची निवड करण्यात आल्याची माहिती आहे. या इस्टेटमध्ये 100 हून अधिक स्वतंत्र व्हिला, तलाव-नदीचा निसर्गरम्य परिसर आणि हेलिपॅडची सुविधा उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. बाहेरील वर्दळ टाळण्यासाठी आणि गोपनीयता राखण्यासाठीच या ठिकाणाची निवड करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
हा सोहळा तीन दिवस चालणार असून पाहुण्यांची संख्या सुमारे 100 पर्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे. त्यापैकी बहुतांश जण कुटुंबीय आणि अतिशय जवळचे मित्र असतील. सर्व पाहुणे व्यावसायिक विमानाने उदयपूरमध्ये दाखल होणार आहेत. मोठ्या प्रमाणावर चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटी उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले जात असले तरी काही निवडक दिग्दर्शक आणि मान्यवरांना निमंत्रण दिल्याची चर्चा आहे.
चाहत्यांनी विजय आणि रश्मिकाच्या नावांचा मिलाफ करून ‘VIROSH’ हे नाव लोकप्रिय केले आहे. त्याच संकल्पनेवर आधारित “The Wedding of VIROSH” अशी थीम या सोहळ्यासाठी ठेवण्यात आल्याची माहिती आहे. अलीकडेच दोघेही उदयपूरकडे रवाना होताना विमानतळावर दिसल्याने चर्चांना अधिक उधाण आले आहे.
लग्न सोहळा पूर्णपणे गोपनीय राहावा यासाठी आंतरराष्ट्रीय सुरक्षा संस्थेची मदत घेण्यात आल्याचे सांगितले जाते. राजस्थान पोलिसांच्या समन्वयाने संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त असेल. कार्यक्रमस्थळी मोबाईल फोन आणि कॅमेऱ्यांवर सक्त निर्बंध घालण्यात येणार असून कोणतीही छायाचित्रे किंवा माहिती बाहेर जाऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. त्यामुळे हा विवाहसोहळा अत्यंत मर्यादित आणि खासगी वातावरणात पार पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.