Image Source:(Internet)
बुलढाणा :
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) या २५ फेब्रुवारी रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते महा आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण शेगाव शहरात उच्चस्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे. राज्यातील तब्बल दहा जिल्ह्यांतील पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले असून मंदिर परिसर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
राष्ट्रपतींच्या दौऱ्यात त्या संत गजानन महाराज मंदिर येथे दर्शनासाठी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने येणाऱ्या प्रत्येक भाविकाची कसून तपासणी केली जात आहे. जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्या निर्देशानुसार राष्ट्रपतींना सर्वोच्च राजशिष्टाचार प्रदान करण्यात येणार असून त्यानुसार विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.
दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दर्शन वेळेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. २४ फेब्रुवारी रोजी प्रशासनाच्या वतीने रंगीत तालीम घेण्यात येणार असल्याने सकाळी १०.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत दर्शन स्थगित राहणार आहे. तसेच २५ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपतींच्या आगमनामुळे सकाळी ७.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत श्रींचे दर्शन बंद ठेवण्यात येईल. त्यानंतर दर्शन व्यवस्था पूर्ववत सुरू होणार असल्याचे संस्थानतर्फे जाहीर करण्यात आले आहे. भाविकांनी या बदलांची नोंद घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
राष्ट्रपती सकाळी हेलिकॉप्टरने शेगावात दाखल होतील. सर्वप्रथम त्या मंदिरात जाऊन संतांच्या समाधीचे दर्शन घेतील. त्यानंतर विसावा परिसरात आयोजित राष्ट्रीय आयुष मेळाव्यात त्या उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून प्रशासन आणि पोलीस यंत्रणा दौऱ्याच्या तयारीत व्यस्त असून शेगाव शहरात चोख सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे.