लाडकी बहीण योजनेचा जानेवारी हप्ता जमा; पुढील रकमेबाबत महिलांची उत्सुकता

    24-Feb-2026
Total Views |
 
Ladki Bahin Yojana
 Image Source:(Internet)
नागपूर :
राज्यातील महिलांसाठी सुरू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) अंतर्गत जानेवारी महिन्याची आर्थिक मदत अखेर लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होऊ लागली आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करणाऱ्या महिलांना यामुळे मोठा दिलासा मिळाला असून आता पुढील हप्त्याची सर्वांना प्रतीक्षा लागली आहे.
 
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सरकारने प्रलंबित रक्कम वितरित करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर सामाजिक न्याय विभागाने १८ फेब्रुवारी रोजी महिला व बालविकास विभागाकडे ९८ कोटी रुपयांचा निधी वर्ग केला. निधी उपलब्ध होताच पात्र महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यापूर्वी डिसेंबर २०२५ चा हप्ता जानेवारी महिन्यात देण्यात आला होता, तर आता जानेवारीचा हप्ता फेब्रुवारी अखेरीस जमा झाला आहे.
 
मात्र फेब्रुवारी महिन्याची रक्कम नेमकी कधी मिळणार, याबाबत शासनाकडून अद्याप स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक लाभार्थी महिला शासकीय कार्यालयांमध्ये चौकशी करत आहेत.
 
दरम्यान, ई-केवायसी अनिवार्य केल्यानंतर काही महिलांची नावे यादीतून कमी करण्यात आली आहेत. तांत्रिक कारणांमुळे प्रक्रिया पूर्ण न झालेल्यांना दिलासा देत ई-केवायसीसाठीची अंतिम मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. जुलै २०२४ पासून सुरू असलेल्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची मदत दिली जाते. पात्रतेच्या अटी पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांना मात्र या योजनेतून वगळण्यात आले आहे.