संविधान वाचवण्यासाठीच राजकारणात प्रवेश; काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांचे ठाम विधान

    24-Feb-2026
Total Views |
 
Praniti Shinde
 Image Source:(Internet)
सोलापूर :
संविधानाचे संरक्षण आणि लोकशाही मूल्यांचे जतन हेच माझ्या राजकीय प्रवासामागचे खरे उद्दिष्ट आहे,असे ठाम विधान काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
 
सोलापूरमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनातील भूमिकेचे स्पष्टीकरण दिले. जनतेची सेवा आणि लोकशाही पद्धतीने प्रशासन चालवणे हीच आमची परंपरा आहे. संविधान टिकवण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही राजकारणात आहोत, असे त्या म्हणाल्या.
 
सोलापूर महापालिका निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आल्या होत्या. मात्र काँग्रेसला अपेक्षित यश मिळू शकले नाही. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या सोलापूरमध्ये सध्या भाजपाची सत्ता आहे. निवडणूक काळात विविध मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांवर टीका करणाऱ्या शिंदे यांनी अलीकडील भाषणात नाव न घेता सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले.
 
गेल्या वर्षभरात निवडणुका आणि आचारसंहितेमुळे विकासकामांना गती देता आली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. “आता उर्वरित कामे पूर्ण करून शहराच्या विकासाला चालना देणे हेच आमचे पुढील ध्येय आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
खासदार निधीतून करण्यात आलेल्या विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी हे वक्तव्य केले. सोलापूर शहरातील अरविंद धाम परिसरात सुमारे दहा लाख रुपयांचा काँक्रिट रस्ता त्यांच्या निधीतून उभारण्यात आला असून त्याच्या शुभारंभासाठी त्या उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी संविधान रक्षणासाठी कार्यरत राहण्याची भूमिका पुन्हा अधोरेखित केली.
 
दरम्यान, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. निवडणुकीनंतर त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच त्या भाजपासाठी काम करत असल्याचा आरोपही करण्यात आला होता. या आरोपांवर त्यांनी त्यावेळी थेट प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आता अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांवर टीका करत त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केल्याचे मानले जात आहे.