नागपूर महानगरपालिकेत ‘महिलाराज’चा नवा अध्याय; सर्व प्रमुख पदांवर महिलांची नियुक्ती

    24-Feb-2026
Total Views |
-राज्यात प्रथमच स्थायी, विषय समित्या आणि झोन सभापतीपदी महिलांचे वर्चस्व

Nagpur Municipal CorporationImage Source:(Internet) 
नागपूर :
शहराच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस विशेष ठरला.नागपूर महानगर पालिका (Nagpur Municipal Corporation)  मध्ये पार पडलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत महिलांच्या नेतृत्वाला अभूतपूर्व संधी देत नवा पायंडा पाडण्यात आला. महापौर आणि उपमहापौर पदांनंतर आता स्थायी समितीसह सर्व महत्त्वाच्या विषय समित्यांच्या अध्यक्षपदी महिलांची निवड करण्यात आली असून मनपात ‘महिलाराज’ अधिकृतपणे सुरू झाल्याचे चित्र आहे.
 
सुरेश भट्ट सभागृह येथे झालेल्या सभेत हा ऐतिहासिक निर्णय जाहीर करण्यात आला. राज्यात पहिल्यांदाच एखाद्या महानगरपालिकेत इतक्या मोठ्या प्रमाणावर सर्व प्रमुख पदांची सूत्रे महिला नगरसेविकांकडे सोपविण्यात आल्याने नागपूरने वेगळा आदर्श निर्माण केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
 
महिला सक्षमीकरणाच्या भूमिकेला अधोरेखित करत सत्ताधारी पक्षाने सर्वच प्रमुख समित्यांवर महिलांची नियुक्ती केली. महापौरपदी नीता ठाकरे, उपमहापौरपदी लीला हात्तीबेड यांची यापूर्वीच निवड झाली होती. त्यानंतर स्थायी समितीच्या अध्यक्षपदी शिवानी दाणी यांची निवड करण्यात आली. परिवहन समितीचे नेतृत्व मंगला खेकरे, स्थापत्य समिती अश्विनी जिचकार, अग्निशमन समिती मायाताई इवनाते, आरोग्य समिती मनीषा अतकरे, विधी समिती निधी तेलगोटे आणि शिक्षण समिती संतोषदेवी लड्डा यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
 
याशिवाय गल्लीच वस्ती निर्मूलन समितीच्या अध्यक्षपदी ऋतिक मसराम, क्रीडा समितीच्या प्रमुखपदी दर्शनी धवड, महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदी सारिखा नांदुरकर, जलप्रदाय समितीच्या प्रमुखपदी दिव्या धूरडेकर तर आकारणी समितीच्या अध्यक्षपदी सरिता कावरे यांची निवड झाली आहे.
 
या निर्णयामुळे मनपाच्या धोरणात्मक आणि प्रशासकीय कारभारात महिलांची भूमिका अधिक प्रभावी होणार असल्याचे मानले जात आहे. विकासकामांमध्ये पारदर्शकता, संवेदनशील दृष्टिकोन आणि ठोस निर्णयक्षमता दिसून येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नागपूरमधील हा प्रयोग राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीही दिशादर्शक ठरेल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.