दिवाळीच्या रात्री किरकोळ वादातून तरुणाचा जीव घेतला; देवनगर हत्याकांडाने नागपुरात खळबळ!

    09-Nov-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : दिवाळीच्या उत्सवादरम्यान नागपुरातील देवनगर परिसरात हिंसक घटना घडून एका तरुणाला जीव गमवावा लागला. रस्त्यावर फटाके फोडण्यास विरोध केल्याच्या कारणावरून झालेल्या वादात २७ वर्षीय अमन उर्फ बॉबी याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अमनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हुडकेश्वर येथील अमन रविवारी रात्री मित्र अक्षय नौकरकर याच्यासोबत देवनगरमध्ये मित्राच्या वाढदिवसासाठी गेला होता. देवनगर चौकातील ज्यूस सेंटरजवळ काही तरुण रस्त्यावर फटाके फोडत होते. यामुळे वाहन पुढे नेण्यात अडथळा निर्माण होत असल्याने अमनने त्यांना बाजूला होण्यास सांगितले. याच मुद्द्यावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला. काही वेळातच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. अक्षय मडावी आणि त्याच्या साथीदारांनी अमनवर चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. त्याच्या पोटावर अनेक वार करण्यात आले. जखमी अवस्थेत त्याला मेडिकल रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या प्रकरणातील मुख्य संशयित अक्षय मडावी याच्याविरोधात यापूर्वी सुमारे २२ गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. तो अंबाझरी परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे सांगितले जात आहे. सुजल, समीर आणि अन्य एका तरुणाचाही या हल्ल्यात सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून सर्व संशयितांचा शोध घेतला जात आहे.

हत्येच्या घटनेनंतर पोलीस प्रशासनानेही तातडीने पावले उचलली. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी बजाजनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन चौहान यांची पोलीस मुख्यालयात बदली केली. मात्र, या निर्णयामुळे वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. मृत तरुण हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी होता आणि आरोपीही बजाजनगर हद्दीतील नसल्याची माहिती समोर येत असल्याने या कारवाईमागील कारण काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, हत्येच्या ठिकाणापासून काही अंतरावर असलेल्या दुचाकी शोरूमला त्याच रात्री आग लागली होती. या घटनेनंतर पोलीस आणि अग्निशमन विभागाचे पथक मदतकार्यासाठी घटनास्थळी होते. रात्री सुमारे १२ वाजता आग नियंत्रणाची कारवाई पूर्ण करून पोलीस पथक ठाण्यात परतले. त्यानंतर अवघ्या २० मिनिटांत देवनगर चौकात हत्येची घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणी बजाजनगर पोलिसांनी अक्षय मडावी आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपींच्या शोधासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत.