
Image Source:(Internet)
मुंबई : मुंबईतील मस्जिद बंदर परिसरात बेकायदेशीररीत्या साठवून ठेवलेल्या विदेशी बनावटीच्या सिगारेट आणि ई-सिगारेटच्या साठ्यावर पायधुनी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. हॉटेल स्टार्स येथे छापा टाकून पोलिसांनी तब्बल ७२ लाख २१ हजार ५५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी १९ जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
पायधुनी पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक परिसरात गस्त घालत असताना मस्जिद बंदर पश्चिम येथील हॉटेल स्टार्समध्ये विदेशी बनावटीच्या सिगारेट आणि इलेक्ट्रॉनिक सिगारेटचा अवैध साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित हॉटेलमध्ये छापा टाकला.
११ हजार विदेशी सिगारेट, २१७२ ई-सिगारेट जप्त-
पोलिसांनी केलेल्या कारवाईत विदेशी बनावटीच्या ११ हजार ७१० सिगारेट आणि २ हजार १७२ इलेक्ट्रॉनिक सिगारेट जप्त केल्या आहेत. या संपूर्ण मुद्देमालाची अंदाजित किंमत ७२ लाख २१ हजार ५५० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. बेकायदेशीर साठवणूक, वितरण आणि विक्रीच्या उद्देशाने हा माल जवळ बाळगल्याचा आरोप संबंधितांवर आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलिस उपायुक्त रागसुधा आर. (दक्षिण परिमंडळ-२) आणि सहाय्यक पोलिस आयुक्त रेणुका बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पायधुनीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अजय कदम, पोलिस उपनिरीक्षक कल्पेश चव्हाण आणि त्यांच्या पथकाने या मोहिमेत सहभाग घेतला.
१९ जणांवर अटकेची कारवाई-
या प्रकरणी मुजीब हाशिम बकेल अहमद (३१), मोहम्मद मिरझाब मुनीर कुन्नई (२५), मोहम्मद अनफास हसीनर (२०), अश्रफ अब्दुला कोटकुल्लम् (४६), अब्दुल रौफ मोहम्मद (४०), अब्दुल अजमल रोशन (३१), अब्दुल तमीम मोहम्मद हनीफा (२४), मोईदिन नाजी अब्दुल नाजर (२५), रफिक इब्राहीम किडार (३८), अबुबखर सोहेल मोहम्मद (२६), मोहम्मद शाकीर अब्दुल कादर (३२), अबु ताहेर इब्राही अर्नथोड मंजिल (३२), अराफत तोटी हामजा (४१), सुबेरअली मोहम्मद तोटी (४८), मोईदिदन कुन्नी शापी (३०), मोहम्मद रफिक युसेनर उमर (४१), मोईदिदन सुबेर (४१), अब्दुल रहेमान कुनहाली तुपकल (४२) आणि अब्दुल बाशित के. ओ. (३३) यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
मुंबईत बेकायदेशीर ई-सिगारेट आणि विदेशी सिगारेटच्या साठ्याविरोधात करण्यात आलेल्या या मोठ्या कारवाईमुळे अवैध विक्रीचे जाळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.