
Image Source:(Internet)
नवी दिल्ली : दिवाळीचा सण देशभरात उत्साहात साजरा होत असतानाच विविध ठिकाणी घडलेल्या आगीच्या दुर्घटनांनी आनंदावर विरजण पडले आहे. फटाके फोडताना झालेल्या अपघातांसह घरांना आणि दुकानांना लागलेल्या आगीत अनेकांना आपला जीव गमवावा लागला. दिल्लीतील नरेला येथे फटाका हातात धरून फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या १० वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू झाला. दुसरीकडे मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यात तीन मजली इमारतीला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथेही दुकानाला लागलेल्या आगीने शेजारील घराला वेढा दिल्याने सहा जणांचा दुर्दैवी अंत झाला.
दिल्लीमध्ये फटाक्याच्या स्फोटाने चिमुकल्याचा बळी
दिल्लीतील नरेला परिसरात रविवारी रात्री सुमारे पावणे दहाच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. १० वर्षीय मुलगा हातात फटाका धरून तो पेटवण्याचा प्रयत्न करत होता. याचवेळी फटाक्याचा अचानक स्फोट झाला. या घटनेत मुलगा गंभीररीत्या भाजला असून त्याच्या छातीला मोठी दुखापत झाली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात येत असताना त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, दिल्लीमध्ये यंदाच्या दिवाळीत अग्निशमन दलाला आगीच्या घटनांबाबत एकूण २५७ फोन आले. मागील वर्षाच्या तुलनेत ही संख्या कमी असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यंदा राजधानीत मोठी आग लागण्याची घटना घडली नसल्याची माहितीही त्यांनी दिली.
मध्य प्रदेशात आगीत सहा जणांचा दुर्दैवी अंत
मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील छपारा शहरात सोमवारी पहाटे चार ते साडेचारच्या दरम्यान तीन मजली निवासी इमारतीला भीषण आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिला, दोन पुरुष आणि एका १६ वर्षीय मुलाचा समावेश आहे.
कुंदनलाल सोनी यांच्या घरात आग लागली, त्यावेळी एकूण दहा जण उपस्थित होते. आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले. यामध्ये सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर अन्य चार जणांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
धाराशिवच्या येडशीत दुकानाला आग; सहा जणांचा मृत्यू
महाराष्ट्रातील धाराशिव तालुक्यातील येडशी येथेही मध्यरात्री अग्नितांडव घडले. येथील करंडे किराणा स्टोअर्स अँड गिफ्ट वेअर या दुकानाला अचानक आग लागली. काही वेळातच आगीने शेजारील घरालाही आपल्या विळख्यात घेतले. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण येडशी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ठाण्यातील इमारतीतील आग; एकनाथ शिंदे मदतकार्यात सहभागी
ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील रहेजा गार्डन येथील रहेजा कार्लाइन इमारतीत रविवारी रात्री आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला. यावेळी हातात टॉर्च घेऊन त्यांनी मदतकार्यातही सहभाग घेतला. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले.
याशिवाय मुंबईतील डोंगरी, भायखळा आणि मीरा-भाईंदर परिसरातही आगीच्या घटना घडल्या. दिवाळीच्या उत्सवात घडलेल्या या भीषण दुर्घटनांमुळे अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सुरक्षिततेच्या दृष्टीने फटाके हाताळताना आणि दिवाळी साजरी करताना विशेष खबरदारी घेण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.