
Image Source:(Internet)
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणावरून सध्या चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. राष्ट्रवादीतील काही नेत्यांची भूमिका तुरुंगात जाण्याची वेळ टाळण्यासाठी असू शकते, असा गंभीर आरोप त्यांनी केला. मात्र, शरद पवार यांच्याबाबत असा विचार करणे योग्य ठरणार नाही, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
शरद पवार यांचे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान मोठे आहे. पुरोगामी विचारांचे नेतृत्व म्हणून त्यांची देशभर ओळख आहे. राजकारणात अनेक वर्षांचे संबंध असल्यामुळे नेत्यांच्या भेटीगाठी होत असतात. त्यामुळे प्रत्येक भेटीचा राजकीय अर्थ लावणे योग्य नसल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. यावेळी त्यांना आराम करण्याचा सल्ला देत दिल्लीची जबाबदारी आम्ही सांभाळू, असे सांगण्यात आल्याचा उल्लेखही वडेट्टीवार यांनी केला. या वक्तव्यामागे वेगळा राजकीय अर्थ दडलेला असू शकतो, अशी टिप्पणी त्यांनी केली.
अजित पवार यांच्या पक्षात दोन गट पडल्याचे चित्र निर्माण झाले असून, राष्ट्रवादीच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. भाजप स्वतःचा राजकीय फायदा करून घेण्यासाठी पक्षांमध्ये वाद निर्माण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले तरी ते महायुतीमध्ये सहभागी होतील, असे आपल्याला वाटत नसल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. राहुल गांधी यांच्या लोकशाही वाचवण्याच्या लढ्याचे समर्थन करताना वडेट्टीवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली. सत्तेत असूनही लोकशाहीच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे, ही देशातील परिस्थिती असल्याचे ते म्हणाले.
देशाला संविधान आणि स्वातंत्र्याची दिशा देणाऱ्या विचारधारेचा वारसा राहुल गांधी पुढे नेत आहेत. मात्र, त्यांच्यावरच विविध आरोप केले जात आहेत. स्वातंत्र्यलढ्यात योगदान नसलेल्या लोकांकडून राहुल गांधी यांच्यावर टीका केली जात असल्याचे म्हणत त्यांनी भाजपला लक्ष्य केले. गोकुळ दूध संघातील सत्तास्थापनेवरूनही विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर निशाणा साधला. नामनियुक्त सदस्यांची नियुक्ती करून मतदारांच्या कौलाला डावलणे म्हणजे लोकशाहीची थट्टा असल्याचे त्यांनी म्हटले.
मतचोरीच्या आरोपांवर राहुल गांधी यांनी खुल्या चर्चेचे आव्हान दिले आहे. मात्र, हे आव्हान स्वीकारण्याची तयारी विरोधकांकडे नसल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. आंदोलनात सहभागी होण्यासाठी लोकांना पैसे देऊन आणल्याचा आरोपही त्यांनी केला. गोकुळमधील सत्तेच्या राजकारणावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, या प्रकरणात आम्ही कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेतला आहे. गोकुळमध्ये झालेला सत्ताबदल न्यायालयात टिकण्याची शक्यता कमी असल्याचे अनेकांचे मत आहे.
तीन मंत्री आणि बारा आमदार-खासदारांची ताकद लावूनही सत्तास्थापनेत यश न मिळाल्यानंतर दुसऱ्या मार्गाने सत्ता मिळवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला. गोकुळच्या सत्तेसाठी महायुतीकडून मोठ्या प्रमाणात राजकीय डावपेच खेळले जात असल्याचे वडेट्टीवार यांनी नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.