
Image Source:(Internet)
मुंबई : मुंबईत पेंग्विन आणण्याच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या राजकारणावर मुंबई महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले आहे. पेंग्विन ही आदित्य ठाकरे यांची संकल्पना असून, सुरुवातीला याच लोकांनी त्याला विरोध केला होता. मात्र, आज पेंग्विनची संख्या २५ वर पोहोचली असून, त्यांच्यामुळे मुंबईच्या तिजोरीतही मोठी भर पडत आहे. त्यामुळे आता त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका त्यांनी केली.
काही पेंग्विनच्या जोड्या म्हैसूरला पाठविण्याची चर्चा असून, त्याबदल्यात जिराफ आणि सिंह मुंबईत आणले जाणार असल्याचेही समजत असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले. प्राणी-पक्ष्यांची देवाणघेवाण नवीन नाही; मात्र सध्या मुंबईकरांना प्राण्यांपेक्षा पाण्याची अधिक गरज आहे, असे त्या म्हणाल्या.
दिवाळीनंतर मुंबईत जाणवत असलेल्या पाणीटंचाईकडे प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचे लक्ष नसल्याचा आरोप त्यांनी केला. साडेचार ते पाच वर्षांनंतर नगरसेवकांची निवड झाली, महापौरही विराजमान झाले; मात्र शहरातील मूलभूत प्रश्न सोडवण्याऐवजी पेंग्विन आणि इतर प्राण्यांच्या मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न, वायू, जल आणि ध्वनी प्रदूषणासह शहरातील विविध समस्यांवर लक्ष देण्याची गरज आहे. पेंग्विन आणण्याची ही वेळ नाही, आधी मुंबईकरांच्या तोंडचे पाणी परत द्या, असा टोला किशोरी पेडणेकर यांनी लगावला.