नागपुरात घर बनले गुटख्याचे गोदाम; बेडरूम अन् स्टोअर रूममध्ये लाखोंचा साठा!

    06-Nov-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : शहरात प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित पान मसाल्याची अवैध विक्री रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. कलमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका घरावर छापा टाकून पोलिसांनी तब्बल २ लाख २३ हजार ५०३ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. धक्कादायक बाब म्हणजे, विक्रीसाठी साठवलेला हा माल दुकानात नव्हे, तर घरातील बेडरूम आणि स्टोअर रूममध्ये लपवून ठेवण्यात आला होता.

५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या एस्कॉर्ट पथकाला जुन्या कामठी रोडवरील न्यू ओम साई नगर परिसरात गुटख्याचा साठा असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने प्लॉट क्रमांक १६ आणि १७ येथील लखन चतरो छाडी (३५) याच्या घरी छापा टाकला. घराची झडती घेतली असता विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित पान मसाला आढळून आला. संपूर्ण साठ्याची किंमत २ लाख २३ हजार ५०३ रुपये असल्याचे स्पष्ट झाले.

आर्थिक फायद्यासाठी या प्रतिबंधित पदार्थांची विक्री करण्याच्या उद्देशाने साठा केल्याचा प्राथमिक संशय आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्त रविना बबन नागले यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध कलमना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिषेक बागडे आणि एस्कॉर्ट पथकाने ही कारवाई केली. आरोपीने हा गुटखा कुठून आणला आणि शहरात त्याचे जाळे किती पसरले आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.