दुष्काळात विकतचे पाणी आणून फुलवली झेंडूची बाग; बाजारभाव कोसळल्याने शेतकरी संकटात

    06-Nov-2026
Total Views |
Image Source:(Internet)

हिंगोली : दुष्काळामुळे पाण्याची टंचाई आणि बाजारात फुलांना मिळणारा कवडीमोल भाव, अशा दुहेरी संकटाचा सामना झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना करावा लागत आहे. हिंगोली जिल्ह्यातील आजेगाव येथील प्रकाश गोरे आणि त्यांच्या पत्नी मीनाक्षी गोरे यांनी एक एकर क्षेत्रात झेंडूची लागवड केली. यासाठी त्यांनी सुमारे ८० हजार रुपये खर्च केले.

दुष्काळामुळे शेतीसाठी पाणी उपलब्ध नसल्याने गोरे दाम्पत्याने एक हजार रुपये देऊन पाच हजार लिटर पाणी विकत घेतले आणि मोठ्या कष्टाने झेंडूची बाग फुलवली. मात्र, मेहनत आणि खर्च करूनही बाजारात व्यापाऱ्यांकडून फुलांना अपेक्षित दर मिळत नसल्याने त्यांचा उत्पादन खर्चही भरून निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे दुष्काळात विकतचे पाणी आणून जगवलेल्या झेंडूच्या बागेतून उत्पन्नाऐवजी आर्थिक नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. शासनाने झेंडू उत्पादक शेतकऱ्यांच्या फुलांची हमीभावाने खरेदी करावी, अशी मागणी प्रकाश गोरे आणि मीनाक्षी गोरे यांनी केली आहे.