नागपुरातील बैद्यनाथ चौकात काळाचा घाला; खुराना ट्रॅव्हल्सच्या बसखाली चिरडून पादचाऱ्याचा मृत्यू

    06-Nov-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : शहरात भरधाव वाहनांमुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बैद्यनाथ चौकात गुरुवारी रात्री खाजगी ट्रॅव्हल्स बसने रस्ता ओलांडणाऱ्या एका व्यक्तीला चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली. बसच्या पुढील चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांची गर्दी जमल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री १०.४० वाजताच्या सुमारास खुराना ट्रॅव्हल्सची बस (एमएच ४० सीटी ८०३८) बैद्यनाथ चौकातून इमामवाड्याच्या दिशेने जात होती. बस वळण घेत असतानाच एक व्यक्ती रस्ता ओलांडत होती. यावेळी बसची धडक बसल्याने तो खाली पडला आणि पुढील चाकाखाली आल्याने त्याचा जागीच जीव गेला. वळणावर वेग नियंत्रित न ठेवल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.

अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठत गर्दीवर नियंत्रण मिळवले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेडिकल रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून बसचालकाबाबतही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.