गावागावांत काँग्रेसची पाळेमुळे मजबूत करणार;काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा निर्धार

    05-Nov-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नाशिक : काँग्रेस संघटनेचा विस्तार केवळ शहरांपुरता मर्यादित न ठेवता गावागावांत पक्षाची ताकद वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक गावात ग्रामशाखा स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत केली जाणार आहे, असा निर्धार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला. नाशिक येथे आयोजित उत्तर महाराष्ट्र आढावा बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.

या बैठकीत संघटनेच्या कामकाजाचा आणि विस्ताराचा वस्तुनिष्ठ आढावा घेण्यात आला. तालुका व जिल्हा कार्यकारिणीचा निर्धारित ढाचा कायम ठेवण्यात येणार असून, वंचित घटकांच्या प्रश्नांवर काँग्रेस संघर्ष उभारणार आहे. 'संघटनेतून सत्ता' हेच पक्षाचे ध्येय असल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले. देशभरात सुरू असलेली आंदोलने आणि पक्षाची भूमिका गावागावांत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ऊस आंदोलनावर बोलताना सपकाळ यांनी भाजपवर निशाणा साधला. आंदोलकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून प्रतिनिधी उशिरा पाठवणे आणि आंदोलकांना चिरडण्याची भूमिका घेणे ही भाजपची कार्यपद्धती असल्याचा आरोप त्यांनी केला. दिल्लीतही शेतकरी आंदोलनादरम्यान अशाच प्रकारे शेतकऱ्यांशी वागण्यात आल्याचे ते म्हणाले.

कुंभमेळ्याच्या तयारीसाठी होणाऱ्या खर्चावरही त्यांनी सरकारला धारेवर धरले. मंडप, हेलिपॅड आणि सीसीटीव्ही व्यवस्थेवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना दुसरीकडे शेतकरी आर्थिक संकटात असल्याचे सपकाळ म्हणाले. कुंभमेळ्याच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावरही त्यांनी टीका केली. या कामांची आगामी काळात चौकशी करण्याचा इशारा देतानाच, अनावश्यक खर्च थांबवून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणी न्यायालयात जाण्याचाही प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, व्हिडीओ प्रकरणावर भाजपकडून करण्यात येणाऱ्या टीकेला उत्तर देताना काँग्रेसनेच संबंधित व्हिडीओ अपलोड केला होता, मात्र निवडक व्हिडीओ दाखवून बदनामी केली जात असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. तसेच पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. विरोधी पक्षातील नेत्यांना खरेदी करण्याची भाजपची कार्यपद्धती असल्याचा आरोप करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.