Image Source:(Internet)
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार Sharad Pawar यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून त्यांची प्रकृती जाणून घेतली. यावेळी मोदी यांनी पवार यांना आरोग्याची काळजी घेण्यासोबतच पुरेशी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. तसेच, तुमचे मार्गदर्शन आम्हाला यापुढेही मिळत राहावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली. या फोनवरील संवादाची माहिती शरद पवार यांचे निकटवर्तीय विठ्ठल मणियार यांनी दिली.
मोदींनी व्यक्त केली प्रकृतीबाबत काळजी-
पंतप्रधान मोदी यांनी फोनवर शरद पवार यांच्याशी संवाद साधताना त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. सध्या राजकीय आणि सार्वजनिक कामांपेक्षा स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य द्या, असा सल्ला त्यांनी दिल्याचे मणियार यांनी सांगितले.
“शरदराव, आता तुम्ही स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. सुप्रिया सुळे आहेत, आम्हीही त्यांच्यासोबत काम करू. तुम्ही आराम करा आणि आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत राहा. तुमची तब्येत चांगली राहणे महत्त्वाचे आहे. तुमचा सल्ला आणि मार्गदर्शन आम्हाला नेहमी मिळत राहावे,” अशा भावना मोदी यांनी व्यक्त केल्याचे मणियार यांनी सांगितले.
दोन दिवसांच्या उपचारांनंतर पवार घरी-
शरद पवार यांना २ नोव्हेंबर रोजी प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. फुफ्फुसात पाणी साचल्याची माहिती वैद्यकीय तपासणीनंतर समोर आली होती. त्यामुळे डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते.
दोन दिवसांच्या उपचारांनंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी दिली. यावेळी खासदार सुप्रिया सुळेही रुग्णालयात उपस्थित होत्या. डॉक्टरांनी पुढील काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
ज्येष्ठ नेत्याच्या प्रकृतीबाबत राजकीय नेत्यांकडून विचारपूस-
शरद पवार रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी समोर आल्यानंतर विविध राजकीय पक्षांतील नेत्यांनी त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश होता. आता डिस्चार्जनंतर पुन्हा फोन करून मोदी यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
दरम्यान, पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने त्यांच्या समर्थकांना दिलासा मिळाला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर ते पुन्हा नियमित कामकाजाला सुरुवात करणार का, याकडे त्यांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.