दिया मिर्झा यांचा अपमान करण्याचा अधिकार महापौरांना कोणी दिला? किशोरी पेडणेकरांचा संतप्त सवाल

    04-Nov-2026
Total Views |
 
Dia Mirza
 Image Source:(Internet)
 
मुंबई : अभिनेत्री दिया मिर्झा Dia Mirza यांच्याबाबत महापौरांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. मुंबईच्या महापौरांना दिया मिर्झा यांचा जाहीर अपमान करण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवाल मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे. प्रत्येक नागरिकाला संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला असून, लोकप्रतिनिधींच्या कामावर प्रश्न उपस्थित करणे हा नागरिकांचा अधिकार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणावर बोलताना पेडणेकर म्हणाल्या की, दिया मिर्झा या मुंबईच्या मतदार असून येथेच मतदान करतात. त्यांच्या नावावरून हिंदू-मुस्लिम असा भेद निर्माण करणे चुकीचे आहे. मुंबई महापालिकेत हिंदू, मुस्लिम, जैन आणि मराठी अशा विविध समाजांचे नगरसेवक आहेत. अशा परिस्थितीत एका कलाकाराचा अपमान करून इतरांचाही अवमान करण्याचा अधिकार महापौरांना कोणी दिला? दिया मिर्झा यांनी सौंदर्य स्पर्धेच्या माध्यमातून देशाचे नाव उंचावले असून, अशा कलाकाराबद्दल जाहीरपणे अपमानास्पद वक्तव्य करणे योग्य नसल्याचे त्या म्हणाल्या.
महापौर प्रत्येक वेळी विषयाचे गांभीर्य न समजून घेता बेताल वक्तव्य करतात आणि त्यामुळे त्यांच्यावरच नामुष्की ओढवत असल्याची टीकाही पेडणेकर यांनी केली. महापौर या प्रथम नागरिक असून महिला आहेत. एका महिलेचा सन्मान राखण्याची जबाबदारी त्यांचीही आहे. पक्षाच्या कार्यक्रमाला कोणाला आमंत्रित करायचे किंवा नाही, हा वेगळा विषय आहे; मात्र एखाद्याचा जाहीर अपमान करणे संविधानाच्या मूल्यांना धरून नाही, असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, या प्रकरणात उच्च न्यायालयाने मुंबई महापालिका आणि महापौरांना खडे बोल सुनावल्याचा दावा पेडणेकर यांनी केला. न्यायालयाने तोंडी निरीक्षणे नोंदविण्यासोबतच आदेशही दिले असून, पुन्हा संदेशवाहक म्हणून नियुक्ती करण्याबाबत निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले. आता महापालिका यावर काय निर्णय घेते, याकडे लक्ष असल्याचेही त्यांनी नमूद केले.
भाजपच्या रॅलीवरही निशाणा-
यावेळी किशोरी पेडणेकर यांनी भाजपच्या रॅलीवरही टीका केली. भाजपच्या कालच्या रॅलीत सहभागी झालेल्या अनेक महिलांना आपण नेमके कशासाठी आलो आहोत, याची माहिती नव्हती. काही महिलांना पैसे देऊन आणण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. रॅलीत सहभागी झालेल्या महिलांना कोणी आणले आणि आंदोलनाचा उद्देश काय, याचीही कल्पना नव्हती, असे पेडणेकर म्हणाल्या. या महिलांचा अपमान करण्याचा माझा हेतू नाही; मात्र त्यांना चुकीची माहिती देऊन किंवा फसवून रॅलीत आणण्यात आल्याचे स्पष्ट दिसत होते, असा दावाही त्यांनी केला.