मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? २ कोटींच्या लाच मागणीच्या आरोपांची चौकशी होणार; केरळ सरकारचा निर्णय

    04-Nov-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी दिल्ली : देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याशी संबंधित जुन्या कथित लाचखोरी प्रकरणाने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. केरळमधील रस्ते विकास प्रकल्पाच्या कामाची बिले मंजूर करण्यासाठी २ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या तक्रारीची दखल घेत केरळचे गृहमंत्री रमेश चेन्निथला यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (VACB) प्राथमिक चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी ही माहिती समोर आली.

२० वर्षांपूर्वीच्या प्रकरणाची पुन्हा चर्चा-
हे प्रकरण २००६ मधील केरळ स्टेट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टशी (KSTP) संबंधित आहे. त्यावेळी ज्ञानेश कुमार केरळमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव म्हणून कार्यरत होते. कोल्लम जिल्ह्यातील चांदयामंगलम येथील कंत्राटदार व्ही. ओ. साजन यांनी केलेल्या तक्रारीनुसार, रस्ते बांधकामाचे काम पूर्ण झाल्यानंतरही संबंधित कंपनीची सुमारे १७ कोटी रुपयांची बिले प्रलंबित ठेवण्यात आली होती.

अभियंत्यांनी बिलांना मंजुरी दिल्यानंतरही धनादेश जारी करण्यात आले नसल्याचा दावा साजन यांनी केला आहे. हे धनादेश मिळवण्यासाठी तत्कालीन सचिव ज्ञानेश कुमार यांनी २ कोटी रुपयांची लाच मागितल्याचे कंपनीचे प्रकल्प अभियंता ली सी बीन यांनी आपल्याला सांगितले होते, असा आरोप साजन यांनी तक्रारीत केला आहे.

मलेशियन अभियंत्याच्या मृत्यूशी प्रकरणाचा संबंध-

या प्रकरणात PATI-BEL या भारत-मलेशिया संयुक्त उपक्रमातील मलेशियन अभियंता ली सी बीन यांचे नावही समोर आले आहे. प्रलंबित बिलांमुळे कंपनीचे कंत्राटदार, पुरवठादार आणि कामगार आर्थिक अडचणीत सापडले होते, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

ली सी बीन यांनी २००६ मध्ये आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या कथित चिठ्ठीत सरकारी अधिकाऱ्यांकडून लाच मागितल्याचा उल्लेख असल्याचे साजन यांनी म्हटले आहे. मात्र, या चिठ्ठीतील मजकूर अद्याप सार्वजनिकरीत्या पडताळलेला नाही. तसेच ज्ञानेश कुमार यांचा या मृत्यूशी संबंध असल्याचेही सिद्ध झालेले नाही.

जुन्या चौकशीवरही उपस्थित झाले प्रश्न-

या प्रकरणाची २००६ मध्ये दक्षता विभागाकडून चौकशी करण्यात आली होती. मात्र, या चौकशीत आपल्यासह प्रत्यक्ष माहिती असलेल्या अनेक व्यक्तींचे जबाब नोंदवण्यात आले नाहीत, असा आरोप साजन यांनी केला आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, यापूर्वीच्या चौकशीत आरोप सिद्ध झाले नसल्याने पुढील कारवाईची आवश्यकता नसल्याचा अहवाल देण्यात आल्याची माहिती केरळ सरकारकडून विधानसभेत देण्यात आली होती.

आता VACB करणार प्राथमिक चौकशी-
साजन यांच्या नव्या तक्रारीनंतर केरळच्या गृह विभागाने दक्षता आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला प्राथमिक चौकशीचे निर्देश दिले आहेत. या चौकशीत तक्रारीतील आरोप, उपलब्ध पुरावे आणि संबंधित व्यक्तींच्या जबाबांची तपासणी केली जाणार आहे. प्राथमिक चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.

विशेष म्हणजे, ज्ञानेश कुमार यांच्यावरील हे आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत. त्यांच्याकडून या नव्या तक्रारीवर अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळे आता दक्षता विभागाच्या चौकशीतून काय निष्पन्न होते, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.